तापी नदीवरील पंप नादुरुस्त झाल्याने ममुराबादचा पाणीपुरवठा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 22:10 IST2019-11-24T22:09:52+5:302019-11-24T22:10:32+5:30
ग्रामस्थांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे

तापी नदीवरील पंप नादुरुस्त झाल्याने ममुराबादचा पाणीपुरवठा ठप्प
ममुराबाद, ता. जळगाव : तापी नदीवरील पंप नादुरुस्त झाल्याने ममुराबादचा पाणीपुरवठा पुन्हा ठप्प झाला आहे. पाणी पुरवठ्याचा वीजपंप वारंवार जळण्याच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांना नेहमीच टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
नांद्रा खुर्द येथे कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे तसेच वीज वाहक तार जळाल्याने व पंप नादुरुस्त झाल्यामुळे पंपिंग ठप्प होण्याचे प्रकार कायम सुरू असतात. आताही तोच अनुभव येत आहे. ४५ अश्वशक्तीचे तीन पंप लागोपाठ जळाल्यानंतर ममुराबादचे पाणीपुरवठा पूर्णत: थांबला आहे. विशेष म्हणजे नादुरुस्त पंप लगेच दुरुस्त केला जात नसल्याने तापी नदीवर एक पंप नादुरुस्त झाल्यावर दुसरा पंप लगेच जोडणे अशल्य होते.
पर्यायी व्यवस्था होईपर्यंत गावात पाण्याचा थेंबही येत नसल्याने ममुराबादच्या ग्रामस्थांना बऱ्याचवेळा गावातील ट्यूबवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. परंतु सर्व ट्यूबवेलचे पाणी हे क्षारयुक्त असल्याने ते पिण्यायोग्य नसते. मात्र, नाईलाज म्हणून ग्रामस्थांना या पाण्याचा वापर करावा लागतो. लग्न सोहळा व इतर कार्यक्रमांसाठी पाणी विकत घेण्याची वेळ येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून तशी तक्रारही ग्रामस्थांची आहे.