लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कुपोषण प्रकरणात अद्यापही ठोस कारवाई नसणे, ग्रामसेवकांच्या पदोन्नत्याचे वारंवार आश्वासन मिळूनही त्या न होणे यासह विविध मुद्द्यांवर मंगळवारी आयोजित जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा गाजण्याची शक्यता आहे. मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास साने गुरुजी सभागृहात ही बैठक होणार आहे. पंचायत राज समितीच्या दौऱ्याआधी होणाऱ्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ऑगस्ट महिन्यात स्थायी समितीची सभा झालेली नव्हती. ती सभा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाली. मात्र, नियमित सभा तहकूब करून १४ सप्टेंबर रोजी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, ४५ ग्रामसेवकांच्या पदोन्नत्या पंधरा दिवसांत करण्याचे आश्वासन तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांनी तीन महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या सभेत दिले होते. मात्र, अद्यापही या पदोन्नत्या झालेल्या नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांकडून सदस्यांना केवळ वेळ मारून नेण्यासाठी उत्तरे दिली जात असल्याचे बोलले जात आहे.
एसीईओंनी घेतला पदभार
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत पदभार घेतला. प्रभारी पदभार असलेल्या के. बी. रणदिवे यांनी त्यांच्याकडील पदभार बाळासाहेब मोहन यांच्याकडे सुपूर्द केला. पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अधिकारी रणदिवे यांनी एसीईओ मोहन यांना माहिती दिली. सहा महिन्यांनंतर जि. प. ला पूर्ण वेळ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाले आहे.