चिंचोली येथील मेडिकल हबचा मार्ग मोकळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:22 IST2021-08-19T04:22:05+5:302021-08-19T04:22:05+5:30
डीपीआर सादरीकरणासह कामाला चालना देण्याचे दिले निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चिंचोली येथे मंजूर होऊन गेल्या अनेक महिन्यांपासून ...

चिंचोली येथील मेडिकल हबचा मार्ग मोकळा !
डीपीआर सादरीकरणासह कामाला चालना देण्याचे दिले निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चिंचोली येथे मंजूर होऊन गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणा-या मेडिकल हब अर्थात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्य संकुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत मंत्रालयात विशेष बैठक घेतली. यात १११७ कोटी निधीचे मेडिकल हबचे नकाशे आणि डीपीआरसह अन्य माहिती जमा करण्याचे निर्देश देण्यात आले असून यासोबत तांत्रिक आणि अतांत्रिक या दोन्ही संवर्गातील बदल्या यंदा रद्द करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा हा अंदाजे पन्नास लाख लोकसंख्या असणारा मोठा जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांश जनता ग्रामीण भागात राहते. तसेच जिल्ह्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग जात असून अपघातांचे प्रमाणदेखील जास्त आहे. या पार्श्वभूमीवर, आरोग्यसेवेची निकड लक्षात घेऊन २०१७ साली मौजे चिंचोली, ता. जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला परवानगी मिळाली. तर, नियमानुसार मेडिकल कॉलेजला संलग्न हॉस्पिटल असावे म्हणून तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा सामान्य रुग्णालयाला वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न करण्यात आले. तसेच प्रत्यक्षातील मेडिकल कॉलेजदेखील सिव्हीलच्याच आवारात सुरू करण्यात आले. तर मेडिकल कॉलेजच्या नावाने चिंचोली शिवारातील ६७ एकर जमीन अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या नावे करण्यात आली. मात्र याचा पुढे काहीही पाठपुरावा करण्यात न आल्यामुळे मेडिकल कॉलेजचा प्रश्न प्रलंबितच राहिला. त्यात गत चार वर्षांपासून मेडिकल हबचे काम रखडले आहे. याची दखल घेत, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आणि वरिष्ठ अधिका-यांसह बैठक घेतली.
या बैठकीत जळगाव येथील मेडिकल हबबाबत इत्थंभूत चर्चा झाली. यानंतर ना. अमित देशमुख यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी दोन महत्त्वाचे निर्देश जारी केलेत. यात सदर मेडिकल हब हे दोन टप्प्यात पूर्ण होणार असून यातील पहिला टप्पा ६६७ तर दुसरा टप्पा ४५० कोटी असे एकूण १११७ कोटी रुपयांचा प्रोजेक्ट असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. यातील पहिल्या टप्प्यात मेडिकल कॉलेजची मुख्य वास्तू, ६५० खाटांचे अद्ययावत रुग्णालय, विद्यार्थी-विद्यार्थिनींचे वसतिगृह, कर्मचारी निवासस्थाने, लायब्ररी, संलग्नित रुग्णालये आणि अन्य सुविधांच्या इमारती व सुशोभीकरणाच्या कामांचा समावेश आहे. याला चालना देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार दिल्ली (एचएससीसी) या कंपनीची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच मेडिकल हबच्या दुस-या टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्तारीकरणाचे काम प्रस्तावित करण्यात आलेले आहे. यासाठी एकूण ४५० कोटी रुपयांची तरतूद लागणार आहे. या दोन्ही टप्प्यांच्या कामांना गती देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. या संदर्भात मेडिकल हबच्या प्रकल्पांना लवकरात लवकर सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून याच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रिक्त पदांबाबतही झाली चर्चा
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत तांत्रिक आणि अतांत्रिक सेवेतील एकूण ५८ कर्मचारी वर्ग करण्यात आले असून यातील २५ कर्मचारी काम करत आहेत. शुश्रूषा संवर्गात एकूण १४७ कर्मचारी काम करत आहेत. तर, वैद्यकीय विभागाच्या अंतर्गत ५५८ पदांपैकी फक्त २४ पदे भरण्यात आलेली आहेत. याचा विचार करता, सध्याची स्थिती लक्षात घेऊन तांत्रिक आणि अतांत्रिक या दोन्ही संवर्गातील कर्मचा-यांच्या २०२१ मध्ये बदल्या करण्यात येऊ नयेत, अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली असून देशमुख यांनी यालादेखील तातडीने मान्यता दिली आहे.