लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ओबीसी समाजाची दिशाभूल करून, ओबीसी समाजाचा विश्वासघात करण्याचे काम राज्यातील महाविकास आघाडीने केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जि.प.च्या निवडणुका होत असून, राज्य सरकारच्या अपयशामुळेच ओबीसी समाजाला दूर ठेवून या निवडणुका होत असल्याने या सरकारचा निषेध म्हणून बुधवारी भाजपकडून सकाळी ११ वाजता तालुकास्तरावर आंदोलन करून, तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी दिली.
मंगळवारी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. संजय महाजन, महानगराध्यक्ष जयेश भावसार यांच्यासह ओबीसी प्रदेश चिटणीस भारती सोनवणे आदी उपस्थित होते. आमदार भोळे यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी केली. गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. राज्य सरकारच्या हलगर्जीमुळे ओबीसी आरक्षणाशिवाय ५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आघाडी सरकारने ज्या ठिकाणी ओबीसी जागा आहेत त्या ठिकाणी भाजपप्रमाणेच ओबीसी उमेदवार उभे करावेत, असेही आव्हान आमदार भोळे यांनी यांनी दिले.
महिलांवरील अत्याचाराविरोधात महिला आघाडीचे आंदोलन
राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असून, या विरोधातदेखील भाजप महिला आघाडीकडून सकाळी १० वाजता राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची महिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली.