कमळाच्या फुलांनी हरताळा तलाव बनला नयनरम्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:18+5:302021-06-04T04:14:18+5:30
हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथील तलावात गेल्या १० वर्षांपासून तलावाचे पाणी आटले असताना कमळ पूर्ण नेस्तनाबूत झाले ...

कमळाच्या फुलांनी हरताळा तलाव बनला नयनरम्य
हरताळा, ता. मुक्ताईनगर : येथील तलावात गेल्या १० वर्षांपासून तलावाचे पाणी आटले असताना कमळ पूर्ण नेस्तनाबूत झाले होते. मात्र, गेल्या वर्षापासून येथे निसर्गाच्या कृपेमुळे जलसाठा शिल्लक राहत असल्याने कमळ फुलांनी तलावात पुन्हा डोके वर काढत हरताळे तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. तलावात दोन खळे एवढ्या भागात दोन ठिकाणी कमळाची फुले उमलली आहेत.
२० वर्षांपूर्वी संपूर्ण तलाव कमळाच्या फुलांनी व्यापला होता. संपूर्ण १७५ हेक्टर ५६ आर. जलसाठा असलेल्या तलावात कमळ शेती करण्यात येत होती. काही ठेकेदारांनी त्यावर चांगलाच डल्ला मारत कमाई केली. परप्रांतात येथून कमळाच्या वाट्या आयशर, छोटा हत्ती आदी वाहनांतून भरून पाठवण्यात येत होत्या; परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये कमी पावसामुळे तलावात पाणी साचत नव्हते आणि त्यातही कमळ संपूर्ण नष्ट झाले होते; परंतु आता येथील बेहर बेटमध्ये बांधण्यात आलेल्या साई मंदिर परिसरात कमळाने पुन्हा डोकं वर करीत जवळपास दोन खड्ड्यांत आपला अधिवास सुरू केला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांनादेखील कमळाच्या फुलाचे सौंदर्य पाहून भुरळ पडत आहे. पूर्वी येथे कमळ असताना २००३ मध्ये श्रावणबाळ समाधी मंदिर जीर्णोद्धार करण्याच्या वेळेस करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी या तलावाचे नामकरणदेखील लक्ष्मीसागर असे केले होते.
ग्रामस्थांना मात्र येथे कमळ नकोच
कमळाची फुले आकर्षक व मोहक वाटत असली तरी ठरावीक मर्यादेपुरते ठीक आहे. मात्र, संपूर्ण तलावात ते वाढल्यास त्याचा धोका मात्र या तलावाला आहे. त्यातून कोणतेच उत्पन्न गावकऱ्यांना मिळत नाही. पूर्वी कमळावर अनेकांनी खूप पैसा कमावला. कमळ शेतीमुळे मत्स्य व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येते. केवळ देखावा म्हणून विशिष्ट भागात त्याची वाढ ठीक आहे; परंतु संपूर्ण तलावभर कमळ उगवायला नको. त्यामुळे तलावाचे सर्व पाणी दूषित होऊन निरुपयोगी ठरत असल्यामुळे असे मंदिर सेवेकरी मधुकर भगत, गजानन ठाकूर, माजी सरपंच जयेश कार्ले, जितेंद्र वाघ व अन्य ग्रामस्थांचे मत आहे.
तलावात बोटिंगसाठी कमळाव्यतिरिक्त पाणीसाठा जिवंत असला पाहिजे. पर्यटनाला चालना मिळेल. तलाव सुशोभीकरण यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे मागच्या वेळेस प्रस्ताव पाठवलेला होता. मात्र, कोणतीही दखल घेतली गेली नाही. पर्यटकांसाठी आकर्षण ठरते; पण कमळ मर्यादेतच असले पाहिजे.
-भागवत धबाडे, तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, मुक्ताईनगर
मोजक्याच जागी कमळ उगवले पाहिजे. कारण मासेमारी करताना अडचणी निर्माण होतात, पाणीही दूषित होते. पूर्ण तलावात कमळ वाढू देऊ नये. मासेमारीवरच गावाची उपजीविका अवलंबून आहे. तलावाचा फायदा गावकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे.
-समाधान कोळी, मासेमारी मजूर