पोटनियमांचा भंग करुन ईश्वरलाल जैन यांना १० कोटींच्या कर्जाची खिरापत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:44 IST2020-12-04T04:44:42+5:302020-12-04T04:44:42+5:30
जळगाव : सोसायटीच्या पोटनियमांचा भंग करुन माजी खासदार ईश्वरलाल जैन, त्यांचे पूत्र मनीष जैन यांच्यासह स्वत: प्रमोद रायसोनी, संचालक ...

पोटनियमांचा भंग करुन ईश्वरलाल जैन यांना १० कोटींच्या कर्जाची खिरापत
जळगाव : सोसायटीच्या पोटनियमांचा भंग करुन माजी खासदार ईश्वरलाल जैन, त्यांचे पूत्र मनीष जैन यांच्यासह स्वत: प्रमोद रायसोनी, संचालक दिलीप चोरडीया, त्यांची पत्नी वंदना चोरडिया यांच्यासह संचालकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० कोटीच्या कर्जाची खिरापत वाटण्यात आली असून त्यामुळेच बीएचआर संस्था डबघाईस आली. लेखापरिक्षक पी.एम.बनवट यांनी केलेल्या लेखापरिक्षणात ही धक्कादायक बाब उघड झाली असून सीआयडीने नेमलेल्या लेखापरिक्षकाच्या अहवालातदेखील हे नमूद करण्यात आले आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी अर्थात बीएचआरमध्ये संचालक मंडळानंतर अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे याची नियुक्ती झाली. संचालकांनी संस्थेचे वाटोळे केल्यानंतर अवसायकानेही तोच कित्ता गिरविला. संस्था सुरुवातीपासून कशी नावारुपास आली व ती कशी डबघाईस आली, याचा स्पष्ट उल्लेख सीआयडीकडे असलेल्या आंतरलेखापरिक्षणात नमूद आहे. सोसायटीचा पोटनियम क्र.४९ अ नुसार विनातारण कर्ज द्यायचे झाल्यास ५० हजार रुपये इतकेच कर्ज देण्याची तरतूद आहे, तसेच पोटनियम कलम ४९ ई नुसार तारण कर्ज द्यायचे झाल्यास ५० लाखापर्यंतची तरतूद आहे, असे असताना संस्थेने बड्या कर्जदारांकडून कोणतेही तारण, हमी न घेता १० कोटी, ५ कोटी, दोन कोटी रुपये कर्ज वाटप केले. काही संचालकांच्या कर्जाचा आकडा हा ५० कोटीच्यावर गेलेला आहे.
संगणकातील नोंदी डिलीट
लेखापरिक्षणात काही पुरावे आढळून येऊ नये म्हणून संस्थेच्या संगणकातील महत्वाच्या नोंदी डिलीट करण्यात आलेल्या आहेत तर काही प्रकरणात दप्तरच गायब झालेले आहे किंवा जाणूनबुजून लेखापरिक्षकांपुढे दप्तर सादर केलेले नाही. आर.बी.डायमंड यांना २८ कोटी रुपयांचे कर्ज नवी पेठ शाखेतून देण्यात आलेले आहे. त्याची परतफेड झालेली नाही. या कर्जाच्या नोंदी संगणकातून डिलीट केल्याचे लेखापरिक्षकाच्या अहवालात म्हटले आहे. विलास गरुड (नाशिक) यांनी २००६-०७ मध्ये ३४ शाखांचे लेखापरिक्षण केले. त्यात शाखा संगणकीय आहेत, मात्र या संगणकात बॅकअप दिलेले नाहीत, त्यामुळे पूर्वीच्या आर्थिक वर्षाचे व्यवहार दिसत नाही. या वर्षातही ४८ जणांना नियमभंग करुन कर्ज वाटप केले आहे. त्यात अंतिम भगवानदास तोतला यांना ६० लाख, त्यांची पत्नी जयश्री यांना ६० लाख, चेअरमन प्रमोद रायसोनी यांना ५ कोटी रायसोनी फांउडेशन ३ कोटी, सांची कन्स्ट्रक्शन यांना ७ कोटी, आर.बी.डायमंड ५ कोटी यासह इतर ४८ जणांना नियमबाह्य कर्ज वाटप केल्याचे लेखापरिक्षणात अहवालात म्हटले आहे.
कागदपत्रांची अपूर्णता, तरीही विजय कोल्हेंना कर्ज
या आंतरलेखापरिक्षणात असेही नमूद आहे, की कागदपत्रांची अपूर्णता असताना देखील १७ जणांना नवी पेठ शाखेतून कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. काहींनी सीसीद्वारे तर काहींना रोख स्वरुपात कर्ज दिल्याचे दाखविण्यात आलेले आहे. त्यात विजय पंडीतराव कोल्हे यांना ११ लाखाचे कर्ज अशाच प्रकारे देण्यात आलेले आहेत.
नियम तुडवून या लोकांना वाटली कर्जाची खिरापत
कर्जदार रक्कम
मनिष ईश्वरलाल जैन १० कोटी
ईश्वरलाल शंकरलाल जैन १० कोटी
निकिता मनीष जैन ५ कोटी
प्रमोद भाईचंद रायसोनी १० कोटी
दिलीप कांतीलाल चोरडीया १० कोटी
महेंद्र मुरलीधर पाटील १० कोटी
नीलेश रामदास पाटील १ कोटी
सिध्दार्थ इन्फो प्रा.लि. ५ कोटी
योगा कन्स्ट्रक्शन २.५ कोटी
कांतीलाल लखीचंद लुंकड ५ कोटी
भोजवानी कन्स्ट्रक्शन ५ कोटी
बालाजी डेव्हलपर्स १.५ कोटी
राजेश छगनलाल पटवा १० कोटी
मंगला शरद मुथा १० कोटी
प्रमिला अशोक मुथा १० कोटी
सुनील विश्वनाथ चौधरी ६ कोटी
सतीश नरशेट्टीवार १० कोटी
अंबादास आबाजी मानकापे १० कोटी
गिरीश जैयस्वाल ८ कोटी