लॉकडाऊननंतर लांब पल्ल्यावरील बसेस रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:17 IST2021-04-01T04:17:12+5:302021-04-01T04:17:12+5:30

जळगाव आगार : मात्र कोरोनामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद जळगाव : तीन दिवसांच्या लॉकडाऊननंतर जळगाव आगारातील सर्व मार्गांवरील सेवा बुधवारपासून ...

Long-distance buses depart after lockdown | लॉकडाऊननंतर लांब पल्ल्यावरील बसेस रवाना

लॉकडाऊननंतर लांब पल्ल्यावरील बसेस रवाना

जळगाव आगार : मात्र कोरोनामुळे प्रवाशांचा अल्प प्रतिसाद

जळगाव : तीन दिवसांच्या लॉकडाऊननंतर जळगाव आगारातील सर्व मार्गांवरील सेवा बुधवारपासून पूर्ववत सुरू झाल्या असून, सकाळच्या पहिल्या सत्रात पुणे, औरंगाबाद, नाशिक, लातूर मार्गावरच्या बसेस वेळापत्रका प्रमाणे रवाना झाल्या. मात्र, कोरोनामुळे प्रवाशांचा या बसेसना अल्प प्रतिसाद असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. दिवसागणिक ही संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाभरात नुकताच तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे बाजारापेठा, आठवडे बाजार, मॉल आदी गर्दी होणारी सर्व ठिकाणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे याचा महामंडळाच्या बस सेवेवर मोठा परिणाम झाला.

दरम्यान, बुधवारी लॉकडाऊन उघडल्यानंतर सकाळपासून जळगाव आगारातील बसेस जिल्हाभरात विविध ठिकाणी व इतर जिल्ह्यांमध्ये रवाना झाल्या. दुपारपर्यंत वेळापत्रका प्रमाणे अनेक गावांच्या बसेस रवाना झाल्याचे सांगण्यात आले. तसेच सायंकाळच्या पुणे येथे जाणाऱ्या बसेसही वेळापत्रका प्रमाणे रवाना झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरगावी बस सोडण्यापूर्वी प्रत्येक बस निर्जंतुक करून रवाना करण्यात आल्या.

इन्फो :

कोरोनामुळे मात्र प्रवासी मिळेना

लॉकडाऊननंतर महामंडळातर्फे सर्व मार्गांवरच्या बसेस सुरू करण्यात आल्या असल्या तरी प्रवाशांचा मात्र या सेवेला अल्प प्रतिसाद असल्याचे सांगण्यात आले. तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या बसेसनाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असून, डिझेलचा खर्चही निघत नसल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले. परिणामी, यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.

Web Title: Long-distance buses depart after lockdown