‘लोकमत’तर्फे रक्तदान महाअभियानास आजपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:57+5:302021-07-02T04:12:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक, थोर स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून ‘लोकमत’च्या वतीने ...

Lokmat's blood donation drive starts from today | ‘लोकमत’तर्फे रक्तदान महाअभियानास आजपासून सुरुवात

‘लोकमत’तर्फे रक्तदान महाअभियानास आजपासून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक, थोर स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त २ जुलैपासून ‘लोकमत’च्या वतीने रक्तदान महाअभियान सुरू होत आहे. याचा शुभारंभ २ रोजी सकाळी ११ वाजता रेडक्राॅस सोसायटी येथे होणार आहे.

गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून कोरोनाच्या संकटाने विविध क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला आहे. यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही गरज ओळखून ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मदिनापासून ‘लोकमत’च्या वतीने रक्तदान महाअभियान सुरू होत आहे. शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या शिबिरात सहभागी होणार आहेत. या शिबिरासाठी जैन उद्योगसमूह संचालित कांताई नेत्रालयाचे सहकार्य लाभत आहे.

या ठिकाणी होणार रक्तदान शिबिर

जळगाव शहरातील इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तपेढी, गोदावरी हॉस्पिटल (भास्कर मार्केट), गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढी विभाग, माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी (जेएमपी मार्केट, चित्रा चौक), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढी या ठिकाणी हे शिबिर होणार आहे. या ठिकाणी विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाल, सरकारी व निमसरकारी कार्यालये तसेच खाजगी व्यापारी व औद्योगिक आस्थापनांमधील कर्मचारी, व्यापारी, विद्यार्थी अशा समाजाच्या विविध घटकांना रक्तदान करता येणार असल्याचे ‘लोकमत’च्या जळगाव आवृत्तीचे कार्यकारी संपादक रवी टाले, उपमहाव्यवस्थापक गाैरव रस्तोगी यांनी कळविले आहे.

Web Title: Lokmat's blood donation drive starts from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.