कोरोना जाऊ दे आणि सर्वांना सुदृढ आरोग्य दे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:24+5:302021-07-22T04:12:24+5:30
शासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अद्यापही मंदिर व मस्जिद बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. बुधवारी बकरी ईदच्या ...

कोरोना जाऊ दे आणि सर्वांना सुदृढ आरोग्य दे...
शासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अद्यापही मंदिर व मस्जिद बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. बुधवारी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरही जिल्हा प्रशासनातर्फे साध्या पद्धतीने बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन मुस्लिम बांधवांना दिले होते. त्यानुसार शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी सकाळपासूनच आपल्या घरीच ईदनिमित्त नमाज पठण केले. दरवर्षी मोठ्या उत्साहात शहरातील ईदगाह मैदानावर सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन, नमाज अदा करतात. एकमेकांना गळाभेट घेऊन, शुभेच्छा देतात. यात एक वेगळेच चैतन्य यावेळी निर्माण झालेेले असते. मात्र, यंदाही कोरोनामुळे मुस्लिम बांधवांतर्फे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी घरच्या घरीच एकत्र येऊन, नमाज अदा केली असल्याची माहिती सुन्नी इदगाह ट्रस्ट व सुन्नी जामा मस्जिदचे अध्यक्ष अय्याज अली, नियाज अली यांनी दिली.
इन्फो :
मस्जिदमध्येही मोजक्याच मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत नमाज पठण
शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने मंदिरांप्रमाणे मस्जिदही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बकरी ईदनिमित्त पहाटे मोजक्याच मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत भिलपुरा येथील सुन्नी जामा मस्जिद व रथ चौकातील जामा मस्जिदमध्ये नमाज पठण करण्यात आले. इतर मुस्लिम बांधवांनी मात्र घरीच नमाज अदा केली. जळगाव मुस्लिम इदगाह व कब्रस्तान ट्रस्टचे सचिव फारुक शेख यांनी अहेमद नगर येथील राहत्या घरी नमाज पठण केले. यावेळी अताउल्लाह खान, वसीम मिर्झा, ॲड. जुबेर खान, ॲड. आमीर शेख, उमर शेख, अली उमर उपस्थित होेते.
इन्फो :
सोशल मीडियावरून एकमेकांना शुभेच्छा
कोरोनामुळे ईदगाह मैदानावर सामूहिक पद्धतीने नमाज पठणाला मनाई असल्यामुळे बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण केले. एकमेकांना भेटून शुभेच्छा देणे शक्य नसल्यामुळे, मुस्लिम बांधवांनी एकमेकांना सोशल मीडियाच्या विविध साधनांद्वारे बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.