हिरो होण्यासाठी घर सोडले, पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:49+5:302021-08-22T04:19:49+5:30

सचिन देव जळगाव : भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गेल्या सात महिन्यांत नजरचुकीने स्टेशनवर किंवा प्रवासात हरवलेल्या व ...

Leaving home to become a hero, police handed him over to his parents | हिरो होण्यासाठी घर सोडले, पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले

हिरो होण्यासाठी घर सोडले, पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले

सचिन देव

जळगाव : भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गेल्या सात महिन्यांत नजरचुकीने स्टेशनवर किंवा प्रवासात हरवलेल्या व विविध कारणांनी घरातून पळालेल्या ७० मुला-मुलींना सुखरूपपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. यामध्ये सर्वाधिक १६ मुले व १३ मुली या खंडवा स्टेशनवर आढळून आल्या आहेत. या सर्वांना आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

भुसावळ रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी जानेवारी ते जुलैअखेर भुसावळ विभागातील विविध स्टेशनवरून ३९ मुले व ३१ मुली अशा ७० जणांना आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे.

पहिली घटना

काही महिन्यांमध्ये रेल्वे प्रवासात हरविलेल्या मुलांपेक्षा, घरातून पळालेली मुले-मुलीच रेल्वे पोलिसांना जास्त सापडून आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी जळगाव रेल्वे स्टेशनवरही मुंबईकडे जाणाऱ्या एका गाडीत झारखंडची दोन अल्पवयीन बालके प्रवास करताना आढळून आल्याने, गाडीतील सुरक्षा बलाच्या जवानांनी या मुलांना जळगाव रेल्वे पोलिसांकडे सोपविले होते. रेल्वे पोलिसांनी शहरातील एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने या बालकांना पुन्हा त्यांच्या माता-पित्यांकडे सोपविले होते.

दुसरी घटना

दोन महिन्यांपूर्वी जळगाव रेल्वे स्टेशनवर एका महिलेचा सातवर्षीय मुलगा अचानक स्टेशनवर खेळता-खेळता गायब झाला होता. यावर पोलिसांनी केलेल्या तपासात हा मुलगा खेळता-खेळता स्टेशनवरील एका गाडीत बसून, मुंबईकडे गेला असल्याचे आढळून आले होते. यानंतर पोलिसांनी तत्काळ मुंबई येथे जाऊन त्या मुलाला जळगावात आणून त्याच्या आईच्या स्वाधीन केले होते.

भुसावळ विभागातील स्टेशननिहाय सापडलेली मुले-मुली

स्टेशन मुले मुली

जळगाव १ १

भुसावळ १२ १०

खंडवा १६ १३

अकोला १ २

नाशिक ५ १

मनमाड ४ ०

मूर्तिजापूर ० १

बडनेरा ० ३

एकूण ३९ ३१

इन्फो :

या कारणांसाठी मुले सोडतात घर

१) अल्पवयीन मुले किंंवा मुलगी घर सोडण्याच्या मुख्य कारणांमध्ये कौटुंबिक वाद हे एक मुख्य कारण आहे.

२) अनेक मुले ही घरातील वादाला कंटाळून घर सोडत असल्याचे समोर आले आहे. तसेच मुंबई-पुणे या मोठ्या शहरांचे आकर्षण, तेथे काहीतरी मोठे होऊन गाडी-बंगला मिळविण्याचे आकर्षण तर काही मुले ही चित्रपट नगरीत ‘हिरो’ होण्यासाठीदेखील घर सोडत असतात.

३) विशेष म्हणजे पोलिसांना आढळून आलेली बहुतांश मुले-मुली ही परप्रांतीय असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. तसेच स्टेशनवर किंवा गाडीत ही मुले आढळल्यानंतर, त्यांची पोलीस दप्तरी नोंद करून त्यांना जिल्हा बालनिरीक्षण गृह किंवा ‘चाईल्ड लाईन’शी संबंधित काम करणाऱ्या संस्थेकडे सोपविण्यात येत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Leaving home to become a hero, police handed him over to his parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.