नेत्यांनो आता आपला ‘इगो’ बाजूला ठेवा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:20 IST2019-11-06T12:19:53+5:302019-11-06T12:20:37+5:30
आमदार शिरीष चौधरी : सत्कार सोहळ््यातच दिला घरचा आहेर

नेत्यांनो आता आपला ‘इगो’ बाजूला ठेवा...
जळगाव : जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीने मला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली, ही अभिमानाची गोष्ट आहे. मात्र, जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी आपला इगो आता बाजूला ठेवण्याची गरज आहे. तुम्ही किती मोठे आहात, हे सर्वांना माहित आहे. मात्र, तुमचा मोठेपणा विरोधकांना दाखवा. ते पैसे देऊन लोकांना गप्प करित आहेत, तुम्हाला बोलता येत असल्याने लोकांना खरी परिस्थिती सांगा. असे सांगत आमदार शिरीष चौधरी यांनी मंगळवारी काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमात पक्षातील-आजी-माजी पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर दिला.
तसेच पक्षामध्ये पद आणि प्रतिष्ठा मिळण्यासाठी आतापासून पुढील निवडणूकांसाठी कामाला लागण्याचे आवाहनही आमदार चौधरींनी यावेळी केले.
जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस भवनात मंगळवारी दुपारी १ वाजता रावेर मतदार संघातील नवनिर्वाचीत आमदार शिरीष चौधरी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रवकत्या डॉ. हेमलता पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना पाटील, अनुसूचीत जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष मनोज सोनवणे, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, डॉ. ए. जी. भंगाळे यांच्यासह डी. जी. पाटील, सलिम पटेल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सुुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार शिरीष चौधरी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाभरातुन आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शिरीष चौधरी यांच्या यशाबद्दल मनोगत व्यक्त करुन, त्यांना शुभेच्छा दिल्या. यापुढे सत्कारानंतर आपले मनोगत व्यक्त करतांना आमदार चौधरी यांनी सांगितले की, या जिल्ह्यात काँग्रेसला जिवंत ठेवण्याचं काम सामान्य जनतेने केले आहे. त्यांच्याशी नाळ जोडल्यामुळेच मला त्यांनी पुन्हा काम करण्याची संधी दिली असल्याचे सांगत, काँग्रेसमध्ये काळाच्या गरजेचेप्रमाणे नेते निर्माण झाले आणि कालांतराने काळाच्या पडद्याआड निघून गेले. मात्र, त्यांनी जो विचार दिला आहे, त्या विचारामुळेच पक्षाची वाटचाल सुरु असल्याचे सांगितले.
आमदार शिरीष चौधरींच्या रुपाने काँग्रेसला नवा आशेचा किरण
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार शिरीष चौधरीच्या सत्कार कार्यक्रमात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हा प्रभारी हेमलता पाटील, आमदार सुधीर तांबे, प्रदेश सचिव डी. जी. पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील यांच्यासह काँग्रेसच्या जिल्ह्यातील डझनभर नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जळगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे अस्तीत्व संपले असून, या विधानसभा निवडणूकीत काँग्रेस राहिल की नाही. अशी भिती राजकीय तज्ञांनी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनीदेखील हे जळगावच्या काँग्रेसच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त केली होती. मात्र, या निवडणूकीत काँग्रेसकडून शिरीष चौधरी आमदार झाल्याने काँग्रेसला नवा आशेचा किरण मिळाला असल्याचे अनेकांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
दरम्यान, यावेळी आमदार सुधीर तांबे यांनी भाजपाने अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार उभे केले. युती असली तरी त्यांनी सेनेसोबत युतीप्रमाणे काम केले नाही. मात्र, भाजपाचं हे साटलोट आता जास्त काळ टिकणार नसल्याचे सांगितले. तसेच खोटी आश्वासनं देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला जनताच धडा शिकविणार असल्याचेही तांबे यांनी सांगितले.
आता डॉक्टरांनींही बाहेर पडावे... यावेळी शिरीष चौधरी यांनी २०१४ मध्ये स्वत:चा पराभव झाल्यानंतर, पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केल्याचे सांगितले. गावागावात जाऊन चार वर्ष नागरिकांशी संपर्क ठेवून, नाळ जोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच हे यश आपल्याला मिळाले आहे. माझ्याप्रमाणे डॉ. उल्हास पाटील यांनींही घराबाहेर पडून, लोकांशी नाळ जोडावी, ‘अपना भी टाईम आऐगा’ असे सांगत मी नेहमी सोबत राहणार असल्याचे सांगितले.
संपत्ती जमा करण्यासाठी राजकारणात आलो नाही
काँग्रेसमध्ये प्रत्येकाला पद पाहिजे, तिकीट पाहिजे व कार्यालयासाठी साहित्याची मागणी केली जाते. मात्र, या आधी तुम्ही पक्षासाठी तुम्ही काय काम केले, असा प्रश्न उपस्थित करित आमदार शिरीष चौधरींनी पक्षातील काही पदाधिकाºयांना नाव न घेता चांगलाच टोला लगावला. तसेच यावेळी त्यांनी संपत्ती जमा करण्यासाठी आम्ही राजकारणात आलो नाही, जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आलो आहे. पक्षाच्या संघटन बांधणीसाठी सर्वांनी हेवेदावे विसरुन काम करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील पंचायत समित्या, जिल्हा परिषद चुकीच्या लोकांच्या ताब्यात आहे. जिल्ह्यात विकासाचा पाया काँग्रेसने रोवला असून, या संस्था पुढील निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या ताब्यात घेण्यासाठी सर्वांनी आतापासूनच काम करण्याचे आवाहन केले. दरम्यान यावेळी त्यांनी जिल्हा मोठा असल्याने जिल्ह्यातील काँग्रेसचे ‘स्ट्रक्चर’ बदलण्याची मागणी केली. जिल्ह््यात शहरासाठी आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष व इतर यंत्रणा बदलण्याची मागणींही केली.