लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - महापालिका प्रशासनाकडून सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करण्यात आली असून, गाळेधारकांनी कारवाई टाळण्यासाठी थकीत भाड्याची रक्कम भरावीच लागणार असल्याचे मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी गाळेधारकांकडे केला आहे. गुरुवारी मनपा आयुक्त व गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मनपात घेण्यात आली. या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली असून, भाडे भरण्याबाबत मनपा प्रशासन ठाम असल्याचे दिसून आले.
गुरुवारी उपोषण ठिकाणी मनपा उपायुक्त प्रशांत पाटील यांनी गाळेधारकांना तोडगा काढण्यासाठी बैठकीचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत गाळेधारक संघटनेचे डॉ.शांताराम सोनवणे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, भाजपचे गटनेते भगत बालाणी, नगरसेवक नितीन बरडे आदी उपस्थित होते. मात्र, या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.
निम्मे रक्कम भरण्याचा दिल्या सूचना - डॉ.शांताराम सोनवणे
गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी बैठकीत आयुक्तांनी गाळेधारकांना निम्मे भाड्याची रक्कम भरण्याचा सूचना दिल्याची माहिती दिली. मात्र, आयुक्तांनी याबाबत नकार दिला असून, कायदेशीरबाबींची पडताळणी करून, नियमात असेल ते करण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. दरम्यान, निम्मे रक्कम भरणे देखील गाळेधारकांना शक्य नसून, आपली पुढील भूमिका गाळेधारकांची बैठक घेवूनच जाहीर केली जाईल अशी माहिती डॉ.शांताराम सोनवणे यांनी दिली.
गाळेधारकांनी केले अर्धनग्न आंदोलन
मनपा प्रशासनाविरोधात गाळेधारकांनी दोन दिवसांपासून साखळी उपोषण पुकारले असून,गुरुवारी गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करून, प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच जोपर्यंत गाळेधारकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरुच राहिल असा इशारा गाळेधारकांनी दिला. अर्धनग्न आंदोलनात भास्कर मार्केट मधील गाळेधारक रिजवान जहागीरदार, सदाशिव सोनवणे, भास्कर वाघोदे, शिवराम कोळी, शालिग्राम सोनार दुपारी मधुकर सिद्धपुरे, लक्ष्मण सांगोरे, इम्रान खाटीक, रवींद्र लोहार, संजय सोनगिरे यांनी अर्धनग्न आंदोलनात सहभाग नोंदविला.
राष्ट्रवादीने दिला पाठींबा
गाळेधारकांच्या आंदोलनाला राजकीय पक्षांकडून पाठींबा मिळत असून, गुरुवारी महाराष्ट प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांची संघटनेचे उपाध्यक्ष राजस कोतवाल यांनी मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन गाळेधारकांच्या अडचणी सांगितल्या. नाना पटोले यांनी संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्याशी दुरध्वनी वर चर्चा करून साखळी उपोषणाला पाठिंबा दिला. यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन, वाल्मिक पाटील यांनी आंदोलनाला भेट देवून पाठींबा दिला.