नेरी येथे जलकुंभाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 18:18 IST2019-12-01T18:18:16+5:302019-12-01T18:18:33+5:30
नेरी बुद्रूक गावाची नेहमीचीच पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता एका नवीन जलकुंभाचे बांधकाम करण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले.

नेरी येथे जलकुंभाचे भूमिपूजन
नेरी, ता.जामनेर, जि.जळगाव : नेरी बुद्रूक गावाची नेहमीचीच पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता एका नवीन जलकुंभाचे बांधकाम करण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले. राष्ट्रीय पेयजल योजनेतुन या जलकुंभाची उभारणी होणार आहे.
जामनेर रोडलगत असलेल्या नवीन रहिवास भागाच्या उंच परिसरात या जलकुंभाचे बांधकाम करण्यात येणार आहे. याकरीता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, माजी सरपंच पंढरी वाघोडे, प्रभारी सरपंच भगवान इंगळे, रतिलाल भोई, प्रभुदास इधाटे, संजय तायडे, रवींद्र भोई, नीलेश पाटील, रवींद्र पाचपोळ यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कंडारी, ता.जळगाव येथील वाघूर धरणातून नेरीसह आठ गाव सामुदायिक पाणीपुरवठा योजना गेल्या २० वर्षांपासून सुरू होती. मात्र योजनेत सातत्य नसल्याने संबंधित गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. त्यातच वीजबिल आणि तांत्रिक अड़चणीमुळे ही योजना बंद अवस्थेत पडलेली आहे. गावाची पाणीटंचाई समस्या कायमची बंद व्हावी याकरीता माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना गेल्या चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत एक कोटी तीस लाख रुपये निधीदेखील मंजूर झालेला होता. वाघूर धरणाच्या बॅक वॉटरजवळील जुने चिंचखेडे या गावाजवळ विहीर करून पाईपलाईन टाकन्यात आलेली होती. त्यामुळे याठिकाणी दीड लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी सरपंच भगवान इंगळे यांनी दिली.