महिलांनो! बसमध्ये चढताना सावध रहा...एकीची पोत तर दुसरीची दागिन्यांची पर्स लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2023 14:06 IST2023-04-25T14:04:53+5:302023-04-25T14:06:30+5:30
नवीन बसस्थानकातील प्रकार ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा

महिलांनो! बसमध्ये चढताना सावध रहा...एकीची पोत तर दुसरीची दागिन्यांची पर्स लांबविली
जळगाव : नवीन बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावरील व पर्समधील मौल्यवान दागिने हातचलाखी करुन लांबविणा-या चोरट्यांची गँग सक्रीय झाली असून सोमवारी बसस्थानकामध्ये वेगवेगळ्या बसमध्ये चढणा-या एका महिलेची गळ्यातील मंगलपोत तर दुस-या महिलेच्या पर्समधील दागिने लांबविल्याची घटना घडली. यात एकूण ७१ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जालना येथील लिलादेवी जयप्रकाश रूणवाल या कुटूंबासह अंकलेश्वर येथे देव दर्शनाला जाण्यासाठी गुरूवार, दि. २० रोजी निघाल्या होत्या. नंतर देवदर्शन करून त्या जळगावातील भाचा रितेश छोरीया यांना भेटण्यासाठी रविवारी गुजराथ येथून निघाल्या होत्या. सोमवारी सकाळी ८.३० वाजता त्या जळगावात पोहोचल्या. भाच्याची भेट घेतल्यानंतर त्या जालना जाण्यासाठी नवीन बस स्थानक येथे ९.२० वाजता आल्या. यावल-लातूर बसमध्ये (एमएच.२०.बीएल.३७६३) बसल्यानंतर त्यांच्या नणंद यांनी सांगितले की, तुमच्या गळ्यातील मंगलपोत दिसत नाहीये. रूणवाल यांनी लागलीच बस थांबवून आजू-बाजूला पोतचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. अखेर कुणीतरी गर्दीचा फायदा घेऊन लांबविल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी डायल ११२ वर जिल्हापेठ पोलिसांना संपर्क साधून घटनेची संपूर्ण माहिती देवून त्यांना बोलवून घेतले. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात ३० हजार रूपये किंमतीची मंगलपोत लांबविल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
महिला निघाली माहेरी, बसमध्ये दागिने-रोकड लंपास
कविता जिभाऊ पाटील (रा. राणमाळा, पोस्ट तिखी, ता.जि.धुळे) यांचे राणीचे बांबरूड येथील माहेर असून माहेरी जाण्यासाठी सोमवारी सकाळी ९ वाजता धुळे-जळगाव बसने प्रवास करून शहरातील नवीन बसस्थानक येथे सकाळी ११.३० वाजता उतरल्या. नंतर त्या जळगाव-पाचोरा बसमध्ये चढल्या. याच दरम्यान गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोठ्या पर्समधील सोन्याचा नेकलेस, कानातील लटकन, साडेचार हजार रूपये ठेवलेली लहान पर्स चोरून नेली. पाटील या बसमध्ये बसल्यानंतर त्यांना पर्सची चेन उघडी दिसली. त्यातील लहान पर्स त्यांना गायब झालेली दिसून आल्यानंतर त्यांनी त्या पर्सचा शोध घेतला. मात्र, मिळून न आल्यामुळे ती चोरी झाल्याची खात्री झाली. त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार ४१ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.