Keep in mind the politics without letting the air go | हवा डोक्यात जावू न देता राजकारणात भान ठेवा - रावसाहेब दानवे
हवा डोक्यात जावू न देता राजकारणात भान ठेवा - रावसाहेब दानवे

जळगाव : राजकारणाचे मर्म जो ओळखतो तोच यात यशस्वी होतो आणि हे मर्म आम्ही ओळखल्याने सध्या आमची हवा आहे. त्यातूनच भाजपमध्ये मेगा भरती सुरू आहे. मात्र यशाची हवा डोक्यात गेली आणि जमिनीवरच्या माणसाची साथ सोडली तर राजकारणी कोठे जाऊन पडतील, हे सांगता येत नाही, असे परखड मत केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जळगावात व्यक्त केले. राजकारणात यशस्वी होण्यासाठी भान ठेवूनच राजकारण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
लोकमत पॉलिटिकल आयकॉन्स आॅफ खान्देश’ या कॉफी टेबल बुकचा प्रकाशन सोहळा मंगळवारी जळगावातील हॉटेल कमल पॅराडाईज येथे रंगला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीने स्वत:चे विशेष स्थान निर्माण केलेल्या खान्देशातील कर्तृत्ववान नेत्यांचा सन्मान करण्यात आला.
व्यासपीठावर दानवे यांच्यासह पर्यटनमंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, जळगावच्या महापौर सीमा भोळे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील उपस्थित होते.
लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वालनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.
‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, जाहिरात विभागाचे उप महाव्यवस्थापक (दक्षिण महाराष्टÑ व गोवा) अलोक श्रीवास्तव, जळगाव आवृत्तीचे सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले.
राजकारणात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही
राजकारणात यशस्वी होण्यासाठी रंग, उंची, शिक्षणाची आवश्यकता नाही तर समाजात दररोज आपला योग्य चेहरा बनविणे गरजेचे आहे. हा योग्य चेहरा आपल्या रोजच्या चांगल्या वागण्यातूनच निर्माण होतो. यासाठी खडतर मार्गक्रमण करावे लागते आणि जो हुशार असतो तो हे मार्गक्रमण सतत सुरुच ठेवतो व तोच राजकारणात यशस्वी होतो, असेही रावसाहेब दानवे यांनी सांगितले. राजकारणात यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या यशामध्ये सर्वांचे कष्ट असल्याचे सांगितले.
आपल्या २० मिनिटांच्या भाषणात दानवे यांनी नेहमीच्या शैलीत चौफेर फटकेबाजी करीत हास्याचे कारंजे उडवित टाळ्या मिळविल्या. अरुणभाई गुजराथी म्हणाले, उद्योगात जशी तेजी- मंदी असते तशीच राजकारणातही असते. मात्र सध्याची तेजी- मंदी आहे, ती आपण आधी कधीच पाहिली नाही. राजकारणात पद नव्हे तर पत महत्वाची असल्याचे ते म्हणाले. अतिशय देखणा कार्यक्रम पाहून त्यांनी ‘लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला’ या गाण्याच्या ओळीही ऐकविल्या. त्यावेळी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. चित्रपटांनी राजकीय मंडळींची चुकीची प्रतिमा निर्माण केल्याची टीका पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांनी केली.

 

 

Web Title: Keep in mind the politics without letting the air go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.