कंडारेची पहिली नियुक्ती सहा महिन्यांसाठीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST2021-07-02T04:13:16+5:302021-07-02T04:13:16+5:30
बीएचआर घोटाळा : ‘त्या’ डायरीत बड्या हस्तींच्या नावांचा उल्लेख जळगाव : बीएचआर पतसंस्थेत घोटाळा झाल्यानंतर संचालकांना अटक झाली तेव्हा ...

कंडारेची पहिली नियुक्ती सहा महिन्यांसाठीच
बीएचआर घोटाळा : ‘त्या’ डायरीत बड्या हस्तींच्या नावांचा उल्लेख
जळगाव : बीएचआर पतसंस्थेत घोटाळा झाल्यानंतर संचालकांना अटक झाली तेव्हा अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे याची संस्थेवर प्रशासक म्हणून पहिली नियुक्ती ८ नोव्हेंबर २०१५ रोजी झाली. ही नियुक्ती सुरुवातीच्या काळात सहा महिन्यांसाठीच होती; मात्र नंतर टप्प्याटप्प्याने त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्याकडे सापडलेल्या डायरीत जळगाव व बाहेरील बड्या हस्तींची नावे असून, त्यांचा सहभाग असल्याचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. कंडारे याने १२५ कोटींच्यावर पावत्या मॅचिंग करून दिल्याचा संशय आहे.
बीएचआर संस्थेतून मे २०१९ मध्ये कंडारे निवृत्त झाला, तेव्हादेखील राज्यातील मंत्री व सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंडारेला मुदतवाढ देण्याबाबत केंद्राकडे शिफारस केली होती. राज्याच्या शिफारशीवरच केंद्र सरकार आदेश करण्याचे काम करते, त्याचाच फायदा कंडारेला झाला.
कंडारे हा सहकार विभागाचाच अधिकारी असल्याने त्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते. बीएचआर ही संस्था मल्टिस्टेट असल्याने त्याच्यावर केंद्रीय सहकार विभागाचे नियंत्रण आहे. ही संस्था अवसायनात गेल्यानंतर कंडारेने अवसायक म्हणून नियुक्तीसाठी फिल्डिंग लावली. संस्था केंद्राच्या अख्त्यारित असली तरी राज्याच्या सहकार आयुक्तांच्या शिफारशीनुसारच राज्यातील सहकार विभागाच्या अधिकाऱ्याच्या शिफारसीनुसारच अवसायकाची नियुक्ती होते.
ठेव पावत्या मॅचिंगबाबत मंत्र्यांच्या दालनात बैठक
कंडारेला न्यायालयात हजर केले तेव्हा त्याच्याकडून मिळालेली माहिती व कोणत्या मुद्द्यावर तपास करायचा आहे याची माहिती याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. त्यामुळे त्याचे रहस्य अधिकच वाढलेले आहे. भाजप, शिवसेनेच्या मागील सरकारच्या काळात एका मंत्र्याच्या दालनात झालेल्या बैठकीत ठेवीच्या पावत्या मॅचिंग करण्यास परवानगी देण्यात आली होती, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे याचे धागेदोरे बड्या व्यक्तींपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकांना एक खासदार, एक आमदार व काही अधिकारी उपस्थित होते, असेही बोलले जात आहे. दरम्यान, हे अधिकार केंद्र सरकारचे असताना राज्यातील सरकारमधील काही जणांनी यात हस्तक्षेप केल्याची चर्चा आहे.
मुदतवाढ मिळाली अन् भांडे फुटले
मे २०१९ मध्ये मुदतवाढ मिळाल्यानंतर कंडारे, सुनील झंवर, महावीर जैन यांनी संगनमत करून मालमत्ता विक्री असो की ठेवीदारांच्या पावत्या वर्ग करण्याच्या नावाखाली गोरखधंदाच सुरू केला. आणि नोव्हेंबरच्या अखेर कंडारेचे भांडे फुटलेच. दरम्यान, कंडारे याने थकबाकीदार असलेल्या लेखापरीक्षकाचीही नियमबाह्य नियुक्ती केल्याचे प्रकरण समोर आले आहे. सीआयडीच्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमध्येही याबाबत ताशेरे ओढण्यात आलेले आहेत.
दोन वेळा फेटाळला होता कंडारेचा अटकपूर्व जामीन
बीएचआर पतसंस्थेतील अपहार व फसवणूक प्रकरणात तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे विशेष न्यायालयाने १८ मे रोजी फेटाळून लावला होता. पुणे न्यायालयातील न्यायाधीश एस.एस. गोसावी यांच्या न्यायालयात त्याने हा अर्ज दाखल केला होता. यापूर्वी ३० मार्च रोजी त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावण्यात आला होता.
भागवत भंगाळेंसह तिघांच्या अर्जावर आज कामकाज
ठेव पावत्या कर्जात मॅचिंग करणारे अटकेतील बड्या कर्जदारांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. त्यावर भागवत भंगाळे, जयश्री तोतला व जयश्री मणियार यांच्या अर्जावर शुक्रवारी कामकाज होणार आहे. प्रेम कोगटा, जितेंद्र पाटील, छगन झाल्टे, अंबादास मानकापे, संजय तोतला व प्रीतेश जैन यांच्या जामीन अर्जावर ५ जुलै रोजी कामकाज होणार आहे. भंगाळे व दोघं महिलांच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाने गुरुवारी आपली बाजू मांडली.