जुवार्डी ग्रामस्थांचा स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST2021-08-13T04:20:07+5:302021-08-13T04:20:07+5:30

जुवार्डी येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्य दिनापासून उपोषणाचा इशारा दिला आहे. उपोषणाच्या निवेदनावर सरपंच सुनीता ठाकरे व उपसरपंच ...

Juvardi villagers warn of Independence Day fast | जुवार्डी ग्रामस्थांचा स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा

जुवार्डी ग्रामस्थांचा स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा

जुवार्डी येथील ग्रामस्थांनी विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्य दिनापासून उपोषणाचा इशारा दिला आहे. उपोषणाच्या निवेदनावर सरपंच सुनीता ठाकरे व उपसरपंच पी.ए. पाटील ह्यांनी सह्या केल्या आहेत.

निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक, बाल विकास अधिकारी, जि.प. जळगाव यांना पाठविण्यात आली आहे.

जुवार्डी येथील वनक्षेत्रातील कुरण क्रमांक ५८मध्ये मेंढपाळ मागील दोन महिन्यांपासून चराईसाठी दाखल झाले असून यामुळे शेतीचे व जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरवर्षी जुवार्डी ग्रामस्थ, शेतकरी व मेंढपाळ ह्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद तंटा होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हा वाद विवाद विकोपास जाऊन अनर्थ होऊ शकतो. मेंढी चराईसाठी ठरावीक भाग नेमून दिला तर शेतीचे व जंगलाचे होणारे नुकसान टळून ग्रामस्थ व मेंढपाळांमध्ये होणारा संघर्ष टळू शकतो. वनविभागाने दोन कायमस्वरूपी कर्मचारी नेमून मेंढपाळांना चराईसाठी ठरावीक भाग नेमून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.

जुवार्डी गावात चार अंगणवाडी असून फक्त दोन अंगणवाडीसाठी इमारत आहे. इतर दोन अंगणवाडीसाठी नवीन अंगणवाडी बांधकाम मंजूर करावे म्हणून ग्रामस्थ मागील सात वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. दोन वर्षांपूर्वी गावातील तरुणांनी ह्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला होता.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खो

तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला जुवार्डी गावासाठी अंगणवाडी बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश दिले होते. परंतु तरीही अंगणवाडी बांधकाम झाले नाही. जुवार्डी गावासाठी २ अंगणवाड्यांचे बांधकाम मंजूर करण्याची मागणी उपसरपंच पी. ए. पाटील यांनी केली आहे.

सात वर्षांपूर्वी खोदली पाणीपुरवठा विहीर, परंतु विद्युत जोडणी नाही

जुवार्डी येथील वनक्षेत्रात वनविभागाच्या परवानगीने वनक्षेत्रातील पाझर तलाव क्रमांक ३ जवळ सहा ते सात वर्षांपूर्वी गावाची पेयजलाची गरज भागविण्यासाठी पाणीपुरवठा विहीर खोदण्यात आली आहे. टंचाई निवारणाच्या निधीतून विहीर खोलही केली आहे. वनविभागाने परवानगी देताना विहिरीसाठी जागा, पाईपलाईन, पंप हाऊससाठी परवानगी दिली आहे. परंतु त्यात विद्युत जोडणी घेण्याचा उल्लेख राहिलेला आहे. फक्त २ इलेक्ट्रिक पोल टाकून या विहिरीसाठी महावितरणकडून विद्युत जोडणीसह स्वतंत्र ट्रान्सफाॅर्मर घेता येऊन जुवार्डीच्या पेयजलाची समस्या सोडवणे शक्य होणार आहे. या विहिरीवर विद्युत जोडणीसाठी परवानगी मिळावी व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वनक्षेत्रातील पाणीपुरवठा विहिरीवर डी.पी. मंजूर करावी, गावासाठी २ अंगणवाडी बांधकाम मंजूर करावे, या मागणीसाठी १५ ऑगस्टपासून उपोषण सुरू करण्याचा इशारा सरपंच सुनीता ठाकरे व उपसरपंच पी.ए पाटील व ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: Juvardi villagers warn of Independence Day fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.