बस येईना! पायीच धरावी लागते शाळेची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST2021-02-05T05:59:52+5:302021-02-05T05:59:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यासह जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. ...

बस येईना! पायीच धरावी लागते शाळेची वाट
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यासह जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, काही ग्रामीण भागात अजूनही राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पायी वाट धरावी लागत आहे.
जळगाव जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांची ८ डिसेंबर २०२० तर २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गांची घंटा वाजली़ सुमारे ५ लाख ६७ हजार विद्यार्थी इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गांमध्ये प्रवेशित आहेत. त्यापैकी दोन लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत हजेरी लावली असून उर्वरित विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. दरम्यान, अजूनही काही ग्रामीण भागांमध्ये बससेवा बंद आहे़ तर काही ठिकाणी वेळेवर बस येत नसल्यामुळे तासनतास बसची वाट विद्यार्थ्यांना पहावी लागते़ त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बसफेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा
तालुक्यातील वावडदाजवळील बिलवाडी गावातील विद्यार्थ्यांना बससेवा मिळत नसल्यामुळे चक्क पाच किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. बिलवाडी येथील चाळीस विद्यार्थी हे म्हसावद शाळेत शिक्षण घेत आहेत. आधी एसटी बस ही १० वाजता नियमित सुरू होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती बंद आहे. खासगी वाहनांचे भाडे परवडणारे नसल्यामुळे शेवटी पायीच विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागत आहे. दरम्यान, जळगाव, वावडदा, बिलवाडी व म्हसावद बससेवा सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन बिलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. बससेवा सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांच्या पालकांकडून देण्यात आला आहे.
विद्यापीठ बससेवाही सुरू करण्याची मागणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही महाविद्यालय व विद्यापीठ बंद आहे. मात्र, शैक्षणिक कामानिमित्त विद्यार्थ्यांना विद्यापीठात ये-जा करावी लागते. परंतु, एसटी महामंडळाची विद्यापीठ बससेवा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. अखेर खासगी वाहनांतून ये-जा करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. काही दिवसांपूर्वी काही विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.
एकूण शाळा
पाचवी ते आठवी - २०५८
नववी ते बारावी - ८६६
एकूण विद्यार्थी
पाचवी ते आठवी - ३ लाख ३४ हजार ८५२
नववी ते बारावी - २ लाख ३२ हजार ५८९