एक कनिष्ठ सहायक निलंबित, दोघांचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:12 IST2021-06-11T04:12:25+5:302021-06-11T04:12:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वारंवार सांगूनही आरोग्य विभागातील पदोन्नत्यांचा विषय मार्गी न लावल्याने, प्रशासकीय कामात दिरंगाई केल्याचा ठपका ...

एक कनिष्ठ सहायक निलंबित, दोघांचे प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वारंवार सांगूनही आरोग्य विभागातील पदोन्नत्यांचा विषय मार्गी न लावल्याने, प्रशासकीय कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत अखेर आरोग्य विभागातील कनिष्ठ सहायक उमेश सपकाळे यांना निलंबित करण्यात आले असून वरिष्ठ सहायक नितीन वारुळे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यासह फरीद पठाण या कनिष्ठ सहायकांचा प्रस्ताव शुक्रवारी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातून मिळाली.
पदोन्नतीच्या विषयांवरून अखेर जि.प. सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांनी बुधवारी कडक कारवाई केली. गेल्या पाच वर्षांपासून आरोग्यसेवकांच्या पदोन्नतीचा विषय रखडला आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी यात दिरंगाई करीत असून त्यांच्यामुळे कामे रखडत असल्याचा मुद्दा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.टी. जमादार यांनी गेल्या स्थायी समितीच्या सभेतही मांडला होता. त्यांना वारंवार सांगूनही ते कामात दिरंगाई करीत असल्याने अखेर त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविल्याचे डॉ. जमादार यांनी सांगितले. यात उमेश सपकाळे यांना निलंबित करण्यात आले असून वारुळे यांच्या प्रस्तावावरही लवकरच स्वाक्षरी करणार असल्याचे सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांनी सांगितले. यासह फरीद पठाण यांच्या निलंबनाचा प्रस्ताव देणार असल्याचे डॉ. जमादार यांनी सांगितले.
आता त्यांच्याच पदोन्नतीला ब्रेक
वर्षानुवर्षे पदोन्नती न करणे, शिकाऊ काळ मंजूर न करणे, बदल्यांबाबतची कारवाई न करणे, प्रशासकीय कामात दिरंगाई असे ठपके ठेवून नितीन वारुळे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दरम्यान, वारुळे यांनाही पदोन्नती मिळाली होती. मात्र, आता कारवाईनंतर त्याला ब्रेक बसणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, दोन कर्मचाऱ्यांना या विभागातून काढून घ्यावे, अशी मागणी डॉ. जमादार यांनी स्थायी समितीच्या सभेत केली होती.
आरोग्यसेवकांना फिल्डवर पाठवा
आरोग्यसेवकांचे खरे काम हे सद्य:स्थितीत लिपिकाचे नसून मुख्यालयात थांबवून ठेवलेल्या आरोग्यसेवकांना फिल्डवर पाठवा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिले आहे. जिल्हा परिषदेत असे दोन तर तालुकास्तरावर असे ७ आरोग्यसेवक हे त्यांची मुख्य जबाबदारी न पार पाडता मुख्यालयात थांबून आहेत, असा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून सीईओंना जाणार आहे.