जोडोनिया धन उत्तम व्यवहारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 22:42 IST2018-10-21T22:42:02+5:302018-10-21T22:42:27+5:30
महाराष्ट्रीय संतांनी मराठी माणसाला केवळ निवृत्ती मार्गाची शिकवण दिली नाही, तर परमार्थासोबत प्रपंच ही सुखाचा कसा करता येईल याचा ...

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे
महाराष्ट्रीय संतांनी मराठी माणसाला केवळ निवृत्ती मार्गाची शिकवण दिली नाही, तर परमार्थासोबत प्रपंच ही सुखाचा कसा करता येईल याचा कानमंत्रही सांगितला आहे. ज्याला प्रपंच धड करता आला नाही त्याला परमार्थ तरी कसा जमेल? म्हणून आधी प्रपंच करावा नेटका । मग पहावे परमार्थ विवेका ।। असा उपदेश समर्थ रामदास स्वामी करतात. धन सर्वांनाच हवे आहे. किती पैसा मिळाला म्हणजे माणूस सुखी होईल? धनाची गरज आणि हाव या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. गरजेची पूर्ती होऊ शकेल. पण हावेची पूर्ती कशी होईल? म्हणूनच हे हवे, ते हवे अजून हवे या हावेपोटी धावण्यातच जीवन संपून जाते आणि जे मिळवले त्याचा उपभोग घ्यायचा राहून जातो. ही हाव आणि तिच्यापोटी होणारी धावाधाव कधी तरी थांबली पाहिजे.
संत तुकाराम महाराज सांगतात. साधन सूचिता, अर्थ सूचिता, बाळगून व्यवहार केला तर सुखाचे दार दूर नाही. ‘उत्तम व्यवहार’ आणि ‘उदास विचार’ हे धनाच्या प्राप्तीचे आणि विनियोगाचे अधिष्ठान असले पाहिजे असा तुकोबारायांचा आग्रह आहे. उत्तम व्यवहार म्हणजे सचोटीचा व्यवहार, नैतिकतेच्या पायावर झालेला व्यवहार, धनाच्या प्राप्तीसाठीचे एवढे तत्व पाळले पाहिजे. प्रपंचासाठी पैसा हा लागणारच. ‘प्रंपचाचा पाया आहे पैशाविण वाया’ असे समर्थ रामदासांंनी सांगून ठेवले आहे. पवित्र मार्गाने आलेले धन म्हणजे ‘लक्ष्मी’ होय. गैरमार्गाने मिळवलेल्या धनाला फक्त पैसा म्हणता येईल. मिळालेला पैसा आपल्याजवळ सदैव राहणार नाही आणि राहिलाच तर आपण तरी कुठे राहणार आहोत? म्हणून हे समाजकार्यासाठी, देश, देव आणि धर्म कार्यासाठी खर्च करावे अशी संताची शिकवण आहे. अभंगाच्या केवळ एका चरणात फार महत्वाचा अर्थशुचितेचा संदेश तुकोबा देतात. तो आचरणात आणण्याचा संकल्प करू या.
प्रा.सी.एस.पाटील, धरणगाव