टीईटी पास नसलेल्या ६० शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:43+5:302021-07-01T04:13:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी आवश्यक असलेली टीईटी परीक्षा वेळेत उत्तीर्ण न केल्याने किंवा अनुत्तीर्ण ...

टीईटी पास नसलेल्या ६० शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी आवश्यक असलेली टीईटी परीक्षा वेळेत उत्तीर्ण न केल्याने किंवा अनुत्तीर्ण झाल्याने जळगाव जिल्ह्यातील सुमारे ६० शिक्षकांच्या नोकऱ्या ऐन कोरोनाच्या संकटात धोक्यात आल्या आहेत.
राज्यात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमच्या तरतुदीनुसार टीईटी उत्तीर्ण उमेदवारच शिक्षक होण्यासाठी पात्र आहे. या नव्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने टीईटी परीक्षा शिक्षक होण्यासाठी बंधनकारक केली आहे. असे असले तरी काही खासगी शिक्षक संस्थांनी शाळांमध्ये टीईटी नसलेल्या शिक्षकांना नियुक्ती केली आहे. दरम्यान, या शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी राज्य शासनाने मुदतही दिली होती. मात्र निर्धारित मुदतीमध्ये या शिक्षकांनी टीईटी पास केली नाही. परिणामी नुकत्याच लागलेल्या न्यायालयाच्या निर्णयानुसार या शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. राज्य शासनाने दिलेल्या मुदतीत अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये नेमणूक केलेले शिक्षक टीईटी उत्तीर्ण झाले नाहीत. अशा सर्वांवर आता गंडांतर येणार आहे.
मागील काही वर्षांपासून राज्यात डीएड आणि बीएड अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मात्र यातील अनेकांना नोकरी लागली नाही. दुसरीकडे टीईटी उत्तीर्ण नसताना शिक्षक म्हणून नोकरी करीत असलेले पगार घेत आहेत. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या बेरोजगारांमध्ये असंतोष पसरला आहे.
००००००००००
- काय म्हणतात संघटना
नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षक होण्यासाठी अत्यावश्यक असलेली टी.ई.टी. अर्थात किमान शैक्षणिक अर्हता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या विरोधात निकाल दिल्याने राज्यातील सुमारे २५ हजार शिक्षकांच्या नोकऱ्या ह्या धोक्यात आल्या आहेत. राज्य शासनाने यापूर्वी या शिक्षकांना मुदतवाढ दिली असली तरी २५ हजार शिक्षक हा आकडा फार मोठा असल्याने त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा तसेच राज्यातील लाखो सुशिक्षित बेरोजगार टी.ई.टी. पात्रताधारक यांच्यावरदेखील अन्याय होणार नाही, असा निर्णय घ्यावा.
- संदीप पवार, जिल्हा कार्याध्यक्ष, शिक्षकसेना
००००००००००००
टीईटी मुद्यावरून आज शेकडो शिक्षकांची नोकरी धोक्यात आलेली आहे. शिक्षकांकडे नोकरी व्यतिरिक्त उदरनिर्वाहसाठी कोणतेही साधन नाही. शासनाने अनुत्तीर्ण शिक्षकांना प्रशिक्षण देऊन तसेच त्यांच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना टीईटी पास होण्याची संधी वाढवून द्यावी.
-मनोज भालेराव, महानगर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी
००००००००००००
एकूण शिक्षक- २६,६९७
अनुदानित शाळांतील शिक्षक-१३,९०५
विनाअनुदानित शाळांतील शिक्षक-१३३३
००००००००००००
टीईटी पास नसलेले शिक्षक - ६०
०००००००००००००००
टीईटी उत्तीर्ण संदर्भात शासनस्तरावर जे आदेश येतील. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. सध्या ज्यांच्याकडे टीईटी नाही, अशा शिक्षकांचे पगार रोखण्यात आले आहे. दरम्यान, शिक्षकांची नोकरी धोक्यात येणार की नाही याबाबत आत्ताच बोलणे उचित ठरणार नाही.
- भाऊसाहेब अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी
००००००००००००००
- शिक्षक म्हणतात...
ज्या शिक्षकांनी टीईटी परीक्षा पास केली नसेल. त्यांना आणखी मुदतवाढ द्यावी, जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होणार नाही. नोकरीवरून काढून टाकल्यास त्यांच्या मुलाबाळांसह कुटुंबाचा प्रश्न उभा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना संधी द्यावी
- यागेश भालेराव, शिक्षक
----------
न्यायालयाच्या निर्णयानंतर जर नियुक्ती झाली तर त्यांच्यावर संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी. परंतु, ज्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांना मुदतवाढ देण्यात यावी.
- नीलेश पाटील, शिक्षक