भेटायला आलेल्या जावयाने लांबविला सासूच्या घरातून ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:24 IST2021-02-23T04:24:44+5:302021-02-23T04:24:44+5:30
जळगाव : वृध्द सासूला बोलण्यात गुंतवून ठेवत सावत्र जावयाने नातीच्या मदतीने घरातील रोकड, दागिने असा २२ हजार रुपये किमतीचा ...

भेटायला आलेल्या जावयाने लांबविला सासूच्या घरातून ऐवज
जळगाव : वृध्द सासूला बोलण्यात गुंतवून ठेवत सावत्र जावयाने नातीच्या मदतीने घरातील रोकड, दागिने असा २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना पिंप्राळा हुडको भागात उघडकीस आली असून याप्रकरणी कस्तुराबाई दशरथ ब्राम्हणे (वय ७०) यांच्या फिर्यादीवरून सावत्र जावई नवल बागुल व नातीविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.
पिंप्राळा हुडको येथे कस्तुराबाई दशरथ ब्राम्हणे या एकट्याच वास्तव्याला आहेत. भीक मागून त्या आपला उदरनिर्वाह भागवितात. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास कस्तुराबाई यांना भेटण्यासाठी सावत्र जावई नवल बागुल आणि त्याची मुलगी असे आले. कस्तुराबाई यांच्याशी गोड बोलून बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यात दोघांनी घरातील लोखंडी पेटीमधील ५ हजार रुपये रोख, ८ हजार रुपये किमतीची २०० ग्रॅम वजनाची चांदीची लक्ष्मीची मूर्ती, ९ हजार रुपये किमतीचे ४ ग्रॅम सोन्याचे टॉप्स असा एकूण २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल काढून घेतला. पुन्हा पेटीला कुलूप लावून चावी कांद्याच्या टोपलीत टाकून दिली. कस्तुराबाई यांनी दोघांना कसे येणे झाले असे विचारले असता, आम्ही तुला फक्त बघायला आलो होतो, तुझे काही एक घेणार नाही, असे दोघांनी सांगितले. थोडा वेळ थांबून दोघे निघून गेले. दोघे गेल्यावर कस्तुराबाई यांनी पेटी उघडून पाहणी केली असता त्यांना पैसे व दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. सोमवारी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
--