जामनेरला वाळूमाफियाने अडविले तहसीलदारांचे वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 22:27 IST2019-12-11T22:27:04+5:302019-12-11T22:27:20+5:30
वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरचा पाठलाग करणाऱ्या तहसीलदारांच्या वाहनाला दुचाकी आडवी लावून अडथळा आणण्याचा प्रकार बुधवारी दुपारी येथील बोदवड चौफुलीजवळ घडला.

जामनेरला वाळूमाफियाने अडविले तहसीलदारांचे वाहन
जामनेर, जि.जळाव : वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरचा पाठलाग करणाऱ्या तहसीलदारांच्या वाहनाला दुचाकी आडवी लावून अडथळा आणण्याचा प्रकार बुधवारी दुपारी येथील बोदवड चौफुलीजवळ घडला. पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुध्द गुन्हा दाखल केला.
या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तहसीलदार अरुण शेवाळे हे लिपीक विरेश शिवपुते यांच्यासह शासकीय वाहनाने शेरी, ता.जामनेर येथे रस्ता वहिवाट मोजणीच्या कामासाठी जात होते. तेव्हा वाळूने भरलेले एक ट्रॅक्टर पुढे जात होते. चालकास थांबण्यास ट्रॅक्टर थांबविण्यासाठी सांगितले. मात्र तो भरधाव वेगाने चौफुलीजवळील डोंगरेजी महाराज नगराकडे पळून जात होता. तेव्हा तहसीलदारांच्या वाहन चालकाने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.
याच वेळी दुचाकीवरुन येत असलेल्या शेख इकबाल शेख इब्राहीम (रा.जामनेर) याने दुचाकी तहसीलदारांच्या वाहना समोर लावून त्यांना ट्रॅक्टरपर्यंत पोहचण्यास अडथळा आणला. दरम्यानच्या काळात ट्रॅक्टरचालक वाळूने भरलेला ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. शिवपुते यांनी पोलिसात शेख इकबाल शेख इब्राहीम याच्याविरुध्द दिलेल्या तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंंग सुंदरडे तपास करीत आहे.