जपानी महिलांना भावली जळगावची जिलेबी व रबडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 13:02 IST2018-12-04T13:02:43+5:302018-12-04T13:02:58+5:30
हितेंद्र काळुंखे जळगाव : भारताची खाद्य संस्कृती ही जगात प्रसिद्ध आहे. आपल्या देशाप्रमाणे विविध चवीचे आणि आरोग्यदायी असे खाद्य ...

जपानी महिलांना भावली जळगावची जिलेबी व रबडी
हितेंद्र काळुंखे
जळगाव : भारताची खाद्य संस्कृती ही जगात प्रसिद्ध आहे. आपल्या देशाप्रमाणे विविध चवीचे आणि आरोग्यदायी असे खाद्य पदार्थ इतरत्र कोठेही नसतील. म्हणूनच परदेशी लोकांनाही येथील खाद्य पदार्थ भावतात. यामुळेच थेट जपानमध्ये जळगावच्या रबडी आणि जिलेबीची ख्याती ऐकून तेथील एक टिम भारत भ्रमंतीवर असताना खास येथे येवून आस्वाद घेतला.
जळगावातील नवीपेठेतील रहिवासी तथा मेडीकल स्टोर्सचे संचालक नितीन लालापुरे यांचे नातेवाईक जपानमध्ये राहतात. गेल्या वर्षी जपान मधील नातेवाईकांमार्फत त्यांच्या शेजारील काही जपानी लोक येथे पर्यटनाला आले असता सहज म्हणून लालापुरे परिवाराने त्यांना जुन्या कापड बाजारातील सतीश अग्रवाल यांच्या स्वीट मार्ट मध्ये नेले असता जपानी पाहुण्यांना येथील जिलेबी आणि रबडीची चव खूपच आवडली. एवढेच नाही तर जिलेबीची रेसीपीही ते घेवून गेले होते.
जपानमध्ये पोहचले नाव
जळगावात हे जपानी येवून गेल्यावर त्यांनी आपल्या परिचितांजवळ जिलेबी आणि रबडीची प्रशंसा केलीच होती. यामुळे जपानच्या किमा या शहरातील ८ महिलांची टिम जळगावच्या अग्रवाल यांच्या दुकानावर नुकतीच आवर्जून येवून गेली. नितीन लालापुरे यांच्या पत्नी ज्योती यांनी त्यांना या ठिकाणी नेले. जपानी टिम मधील फूकूशिमा, यांग, चो, नितो, कोंदो, कनेहारा, कुमरा या जपानी महिलांनी यावेळी या पदार्थांचा मनसोस्कत आस्वाद घेतला. जाताना सोबत जळगावच्या गोड आठवणीही घेवून गेल्या.