Jalgaon: कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
By विजय.सैतवाल | Updated: October 16, 2023 15:53 IST2023-10-16T15:52:46+5:302023-10-16T15:53:12+5:30
Jalgaon News: एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी विजेचा धक्का (शॉक) लागून राहुल दरबार राठोड या तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. तर सोबत असलेला दुसरा कामगार जीवन गजानन चौधरी हा गंभीररीत्या भाजला गेला.

Jalgaon: कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
- विजयकुमार सैतवाल
जळगाव - एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी विजेचा धक्का (शॉक) लागून राहुल दरबार राठोड (२२, रा. शेलगाव, ता. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश, ह.मु. फातीमा नगर, जळगाव) या तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. तर सोबत असलेला दुसरा कामगार जीवन गजानन चौधरी (रा. बेदावद ता. जामनेर) हा गंभीररीत्या भाजला गेला. ही घटना सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. मयत तरुण घरातील कर्ता व्यक्ती होता. त्याच्या मृत्यूची वार्ता समजताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहुल राठोड हा तरुण आई-वडील व लहान भाऊ यांच्यासोबत जळगाव शहरातील फातीमा नगरात वास्तव्याला होता. एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाचा पहिला दिवस असल्याने सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कामावर हजर झाला. यावेळी काम करीत असताना त्याला विजेचा धक्का (शॉक) लागला. सोबत असलेला जीवन गजानन चौधरी हा गंभीररित्या भाजला गेला आहे. दोघांना तातडीने खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी राहुलला मयत घोषित केले. तर जखमीस खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून राहुल हा एमआयडीसीतील एका कंपनीत वेल्डींग करण्याचे काम करत होता. नंतर सोमवारपासून त्याने प्लास्टीक कंपनीत कामाला सुरूवात केली होती. कामाच्या पहिल्याच दिवशी त्याचा दुदैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.