जळगाव : अडचणीच्या काळात मदत करणा-यांना घडवली परदेशात सफर, वडली येथील रवींद्र उंबरे याची कृतज्ञता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 09:12 IST2018-01-16T09:04:01+5:302018-01-16T09:12:24+5:30
गरिबीवर मात करीत अवकाशाला गवसणी

जळगाव : अडचणीच्या काळात मदत करणा-यांना घडवली परदेशात सफर, वडली येथील रवींद्र उंबरे याची कृतज्ञता
चुडामण बोरसे / जळगाव - घरी अठराविश्वे दारिद्र्य... त्यावरही त्याने मात करीत शिक्षण सुरूच ठेवले. शिक्षणाच्या या गोडीने त्याला थेट स्वित्झर्लंडमध्ये पोहचविले. आपल्या शिक्षणासाठी ज्यांनी मदत केली. त्यांना त्याने स्वित्झर्लंडची सैर घडवून आणली. अगदी पासपोर्टपासून सर्व खर्च केला. अवकाशाला गवसणी घालत त्याने गरिबीवर मात केली आहे. आणि हे सगळे घडून आले ते लोकमत वाचनामुळे.
कृतज्ञतेच्या हा सोहळ्याचा नायक आहे रवींद्र रामलाल उंबरे. जळगाव तालुक्यातील वडली येथील रहिवासी. रवींद्रची घरची स्थिती अतिशय नाजूक. घरी आई आजारी असल्याने त्याच्यावर स्वयंपाकाची जबाबदारी आली.यातून त्याला स्वयंपाकाची आवड निर्माण झाली.
जळके, पाथरी येथे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर रवींद्रने जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात प्रवेश घेतला. पैसे नसल्याने वसतिगृहात राहू लागला. कॉलेजात प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण सुरु असतानाच पुणे येथील हॉटेल मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे ठरविले. या कोर्सच्या तीन वर्षाची शासकीय फी भरण्यासाठी पैसा नव्हता.
काही कालावधीनंतर वडली गावातील समाजमंदिराचे लोकार्पण राज्याचे तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सुरेशदादा जैन यांच्या हस्ते झाले. सुरेशदादांनी आपल्या भाषणात उच्च शिक्षणासाठी शासकीय शिष्यवृत्तीची माहिती दिली. यानंतर काही दिवसांनी स्वित्झर्लंड येथे हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी लागणार असल्याची जाहिरात लोकमतमध्ये रवींद्रचे भाऊ नारायण उंबरे यांच्या वाचनात आली. इथूनच रवींद्रच्या आयुष्याला वळण मिळाले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. आता परदेशात जायचे तर जवळ पैसा नव्हता. पण जिद्द कायम होती. त्याची जिद्द पाहून जळके येथील सरपंच रमेश जगन्नाथ पाटील आणि रवींद्रचा भाऊ नारायण उंबरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेऊन रवींद्रविषयी माहिती दिली.
सुरेशदादा यांनी लागलीच संबंधितांशी संपर्क साधून शिष्यवृत्तीसाठी पाठपुरावा केला आणि अखेर शिष्यवृत्ती मंजूर झाली. त्यावेळी स्वित्झर्लंडसाठी देशभरातून १० तरुणांची निवड झाली. आता शिष्यवृत्ती मिळाली असली तरी परदेशात जाण्यासाठी पुन्हा पैशांची अडचण निर्माण झाली. एक वेळ अशी आली की जाणेच रद्द होईल की काय. त्यावेळी जळक्याचे रमेश पाटील व पाळधी ता. जामनेर येथील शिक्षक रत्नाकर राघव पाटील यांनी रवींद्रला मदतीचा हात दिला आणि रवींद्र उंबरे स्वित्झर्लंडला पोहचला. तिथे पुन्हा परीक्षेचा सोपस्कार पार पडल्यानंतर त्याला एका स्थानिक हॉटेलात नोकरी मिळाली. त्यासाठी जर्मन, फ्रेंच आणि इटालियन तीनही भाषा रवींद्रने काही महिन्यात अवगत केल्या. सोबतीला इंग्रजी होतीच.
रवींद्रचे काम पाहून हॉटेल मालक प्रिन्स जोसेफ खुश झाले. एक दिवस मग जोसेफ यांनी रवींद्रजवळ त्यांचे गाव पाहण्याची इच्छा व्यक्त केली. दोन वर्षापूर्वीच जोसेफ हे वडली येथे दोन दिवस मुक्कामी होते. आता रवींद्र परदेशात चांगलाच स्थिरावला आहे. हॉटेल सोडून स्थानिक एअरलाईन्स कंपनीत लागला आहे. महिन्याला तीन लाख रुपये पगार घेत आहे. ज्या शाळेत शिकला त्या शाळेला त्याने दैनंदिन लागणाºया वस्तू भेट दिल्या. ज्या विभागाने ३३ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली. त्या राज्याच्या सामाजिक न्याय विभागाला तीन लाखाचा निधी त्याने दोन महिन्यापूर्वीच दिला. जे अडचणीच्या काळात मदतीसाठी उभे केले. त्या रमेश पाटील व रत्नाकर पाटील यांनाी त्याने स्वित्झर्लंडची सैर घडवून आणली. व्हीसा आणि तिकिटाचाही खर्चही रवींद्रनेच केला हे विशेष.
विद्यार्थ्यांनी प्रथम म्हणजे इंग्रजीकडे लक्ष द्यावे, स्वत:मधील न्यूनगंड झटकायला हवा. वाचन केल्यानेच इथपर्यंत पोहचू शकलो. शासकीय योजना भरपूर आहेत, त्याचा अभ्यास करायला हवा. आपल्या यशाचे श्रेय सुरेशदादा जैन यांना आहे. कारण त्यांच्याच मदतीमुळे इथंपर्यंत पोहचू शकलो. - रवींद्र उंबरे, वडली ता. जळगाव.