जळगावात महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना खुर्चीसह बांधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST2021-03-27T04:17:03+5:302021-03-27T04:17:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील सात हजार शेतक-यांचे वीज कनेक्शन कट केल्याने व वीज वितरण कंपनीचे अधिकारी ...

In Jalgaon, the Superintending Engineer of MSEDCL was tied with a chair | जळगावात महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना खुर्चीसह बांधले

जळगावात महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना खुर्चीसह बांधले

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील सात हजार शेतक-यांचे वीज कनेक्शन कट केल्याने व वीज वितरण कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करत नाही. यामुळे संतप्त झालेल्या चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह तीस ते पस्तीस शेतक-यांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता फारूख शेख यांना चक्क खुर्चीला बांधले. एवढेच नव्हे तर त्यांना थेट खुर्चीसकट उचलून कार्यालयाबाहेर नेले. या प्रकरणी आमदार चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील ७ हजार शेतक-यांचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीकडून कट करण्‍यात आले. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील शेतक-यांनी आमदार मंगेश चव्हाण यांचे कार्यालय गाठले. वीज कनेक्शन नसल्यामुळे पाणी नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. पाच ते सहा गुरांचा मृत्यू झाला आहे, अशी व्यथा शेतक-यांनी त्यांच्याकडे मांडली. आमदारांनी लागलीच महावितरणचे अधीक्षक अभियंता फारूख शेख यांना संपर्क साधला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. अधिकारी फोन उचलत नसल्यामुळे आमदार चव्हाणांनी थेट शेतक-यांना सोबत घेवून सायंकाळी ५ वाजता जळगावातील एमआयडीसीत असलेले महावितरणचे कार्यालय गाठले.

अधीक्षक अभियंत्‍यास‌ दोरीने बांधले

चाळीसगाव तालुक्यातून महावितरणने सात हजार वीज कनेक्शन तोडण्यात आल्याबद्दल त्यांनी अधीक्षक अभियंत्यांना जाब विचारला. नंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता फारूक शेख यांच्याकडे आमदार चव्हाण यांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडले. शेख आणि आमदार यांच्यात काही वेळ शाब्‍दीक वाद झाला. मात्र संतप्त झालेल्‍या आमदार मंगेश चव्हाण यांनी दोरी घेवून चक्क अधीक्षक अभियंता शेख यांना खुर्चीला बांधले. यानंतर त्यांना चपलांचा हार घालण्याची तयारी देखील केली होती.

अभियंत्‍यास खुर्चीला बांधून बाहेर आणले.

अधीक्षक अभियंत्यास आमदारांसह शेतक-यांनी दोरीने बांधल्यानंतर थेट खुर्चीसकट उचलून कार्यालयाबाहेर नेले. इतकेच नाही तर त्यांनी महावितरणच्या कार्यालयास कुलूप ठोकले. दरम्यान, महावितरण कार्यालयात गोंधळ सुरू असल्याचे कळताच, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे, पोलीस उपनिरिक्षक रामकृष्ण पाटील यांच्यासह कर्मचार्यांनी थेट घटनास्थळ गाठले. त्यानंतर शेतक-यांना पोलिसांनी ताब्यात घेवून पोलीस ठाण्‍यात आणले.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातून घेतले आमदारांना ताब्यात

महावितरण कार्यालयात गोंधळ घातल्यानंतर आमदारांनी महावितरणच्या अधिका-यांची तक्रार करण्‍यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आमदारांना ताब्यात घेण्‍यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व डीवायएसपी कुमार चिंथा होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून पोलीस अधीक्षकांनी आमदार चव्हाण यांना ताब्यात घेवून एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात नेले. तर काही शेतक-यांना जिल्हापेठ पोलीस ठाण्‍यात नेण्‍यात आले.

कोट

महावितरणच्या अधिका-यांनी चाळीसगाव तालुक्यातील काही शेतक-यांचे वीज कनेक्शन कट केल्याच्या कारणावरून महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना दोरीने बांधल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणी आमदारासह संशयितांना ताब्यात घेतले आहे.

-डाॅ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक, जळगाव.

शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा यासाठी मी अनेकदा अधीक्षक अभियंता यांना लेखी सूचना केल्या मात्र त्यांची दखल घेतली गेली नाही. तीन महिन्यांचे बिल भरण्याचे कारण सांगून शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा बंद केला. जेव्हा शेतकरी बिल भरायला गेले तेव्हा मात्र मागील १० वर्षाची थकबाकी भरा म्हणून अधिकारी सांगतात. मी आमदार मिरविण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी झालो आहे. त्यामुळे कथा आणि व्यथा मांडण्यासाठी या आंदोलनाचा मार्ग निवडला.

-आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगाव

Web Title: In Jalgaon, the Superintending Engineer of MSEDCL was tied with a chair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.