जळगावात शिवसेनेने भाजप कार्यालयात फेकल्या कोंबड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:21 IST2021-08-25T04:21:27+5:302021-08-25T04:21:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेने आंदोलन ...

जळगावात शिवसेनेने भाजप कार्यालयात फेकल्या कोंबड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेने आंदोलन करीत घोषणा देत थेट भाजपच्या बळीराम पेठेतील कार्यालयात धडक दिली. यावेळी काही शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयात थेट जिवंत कोंबड्या फेकल्या व कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करीत असताना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्ते व शिवसैनिकांमध्ये झटापट होऊन प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला.
नारायण राणे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून सुरुवातीला सकाळी टॉवर चौकात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिसात नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व पदाधिकारी हे राणे यांच्याविरोधात घोषणा देत थेट भाजप कार्यालयावर धडकले. महापौर जयश्री सोनवणे, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप कार्यालयावर चालून आले. याठिकाणी भाजपचेही काही कार्यकर्ते उपस्थित असल्याने त्यांनीही घोषणाबाजी केली. याच वेळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी दोन कोंबड्या भाजप कार्यालयात फेकल्या. याच कोंबड्या भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा शिवसेना कार्यकर्त्यांच्या दिशेने फेकल्या.
भाजप-सेना आमनेसामने
गोंधळ उडाल्यानंतर पोलिसांनी भाजप कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद केले. शिवसेनेने भाजप कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजप व सेना आमने-सामने आले होते. यावेळी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते; पण त्यानंतर काही शिवसैनिक थेट प्रवेशद्वार ओलांडून कार्यालयात घुसले. त्यांनी कार्यालयाचा मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. भाजप कार्यकर्त्यांनीही प्रतिकार केल्याने वाद विकोपाला जाऊन एकमेकांना धक्काबुक्की झाली. यात काहींनी लाथाबुक्क्यांनी मारहाणदेखील केली. शिवसेनेचे उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरपालिका विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक विराज कावडिया यांच्यात व भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यावेळी भाजप कार्यालयात मंत्री प्रकाश पंडित, राहूल वाघ, सुभाष शौचे, आनंद सपकाळे, मिलिंद चौधरी, सागर जाधव, रोहित सोनवणे, गौरव पाटील, हर्षल चौधरी आदींनी प्रतिकार केला.