Jalgaon: ऑनलाईन फसवणूक: टास्क तर पूर्ण केला; मात्र नफा सोडाच, पावणे नऊ लाख मुद्दलही गेली
By विजय.सैतवाल | Updated: September 10, 2023 16:20 IST2023-09-10T16:18:51+5:302023-09-10T16:20:03+5:30
Jalgaon News: टास्क पूर्ण करुन त्यामध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत चेतन कन्हैया फिरके (३१, रा. जामनेर) यांची आठ लाख ७५ हजार १७५ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली.

Jalgaon: ऑनलाईन फसवणूक: टास्क तर पूर्ण केला; मात्र नफा सोडाच, पावणे नऊ लाख मुद्दलही गेली
- विजयकुमार सैतवाल
जळगाव - टास्क पूर्ण करुन त्यामध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत चेतन कन्हैया फिरके (३१, रा. जामनेर) यांची आठ लाख ७५ हजार १७५ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जामनेर येथील रहिवासी असलेले चेतन फिरके यांच्या व्हॉटस् अप व टेलिग्राम आयडीवर ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२३ या दरम्यान एका जणाने संपर्क साधत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना टास्क देऊन तो पूर्ण करुन त्यात गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा देण्याचे सांगितले. त्यासाठी या अनोळखीने फिरके यांच्याकडून वेळोवेळी एकूण आठ लाख ८२ हजार रुपये स्वीकारले. त्यापैकी टास्क पूर्ण केल्याबद्दल भरलेल्या एकूण रकमेपैकी केवळ सहा हजार ८२५ रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. उर्वरित नफा व मुद्दल रक्कम मात्र परत केली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिरके यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ९ सप्टेंबर रोजी रात्री अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव पाटील करीत आहेत.
बनावट पत्र दिले
फिरके यांना सांगितल्याप्रमाणे नफा व त्यांची रक्कम दिली नाही. मात्र त्यांना एक बनावट पत्र दिले असून त्यावर विदेशातील एका स्टॉक एक्सचेंजचे नाव आहे.