जळगावात दोन टेम्पो भरून पतंगाचा मांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:47 IST2021-01-08T04:47:27+5:302021-01-08T04:47:27+5:30
जळगाव : अत्यंत घातक व जीवघेणा असलेल्या मांजावर बंदी असतानाही त्याची विक्री करणाऱ्या शहरातील पाच दुकानांवर सोमवारी पोलीस अधीक्षकांच्या ...

जळगावात दोन टेम्पो भरून पतंगाचा मांजा जप्त
जळगाव : अत्यंत घातक व जीवघेणा असलेल्या मांजावर बंदी असतानाही त्याची विक्री करणाऱ्या शहरातील पाच दुकानांवर सोमवारी पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने एकाच वेळी छापा टाकण्यात आला. त्यात हजारो रुपये किंमत असलेला दोन मालवाहू टेम्पो भरून मांजा पोलिसांनी जप्त केला असून, स्वतंत्र पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मकरसंक्रातींच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्यासाठी मांजाचा वापर होतो. मांजा नायलॉनचा असल्यामुळे गळ्यात व शरीरात अडकून अनेकांचा त्यात जीव गेला आहे. गेल्या आठवड्यात नाशिक शहरात रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यात पतंगाचा मांजा अडकून जीव गेला होता. अत्यंत घातक असलेल्या या मांजाच्या विक्रीला शासनाने बंदी घातली आहे, असे असतानाही शहर व जिल्ह्यात मांजा विक्री होत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सोमवारी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना धाडसत्र राबविण्याचे आदेश सोमवारी दिले होते. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या पथकाने दुपारी शहरातील पतंग गल्ली, जोशी पेठ, शनी पेठ व बळीराम पेठेत धाड टाकली. पतंग गल्लीत सुरेश पतंग या दुकानातून १३ हजार ३९०, प्रकाश पतंग या दुकानातून ८१० व बळीराम पेठेतील भरत सुरतवाला या दुकानातून २५० रुपये किमतीचा मांजा जप्त करण्यात आला. भरत ईश्वरलाल छत्रीवाला (५४, रा. बळीराम पेठ) यांच्याविरुध्द शहर पोलिसात तर कुणाल नंदकिशोर साखला (२८, रा. जोशी पेठ) व रितीक पुरन खिच्ची (१९, रा. जोशी पेठ) यांच्याविरुध्द शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही गुन्ह्यात पोलीस कर्मचारीच फिर्यादी आहेत. आणखी दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.