जळगाव :नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 17:34 IST2023-04-29T17:33:59+5:302023-04-29T17:34:17+5:30
: वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावेत.

जळगाव :नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी
कुंदन पाटील
जळगाव : वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावेत. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात शनिवारी त्यांना पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली.
नशीराबाद, बेळी, निमगांव, उमाळे, देव्हारी, चिंचोली परिसरात केळी, लिंबू, पपई आदि पिकांसोबतच झाडे उन्मळून पडली आहे. तसेच दोनशेवर घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, तहसीलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी राऊत, महावितरणचे आवटे, विस्तार अधिकारी पी. बी. अहिरे, स्थानिक लोकप्रतिनिधींसहग्रामसेवक, तलाठी, कृषि सहाय्यक यावेळी उपस्थित होते.
बेळीला टॅंकरने पाणीपुरवठा
बेळी, निमगांव व नशिराबाद येथे वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोल व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा. तसेच विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत आवश्यकता भासल्यास गावकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी टॅकरने पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करण्याचे निर्देश दिले. घरांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु झाले आहेत. घरकुलांच्या यादीतील नुकसानग्रस्त घरांना प्राधान्याने घरकुल मंजूर केले जाईल, असे जिल्हाधिकारी मित्तल यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन
जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ सुरु झाला आहे.बियाणे, खते व किटकनाशकांबाबत येणाऱ्या अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली आहे. या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत संपर्क साधता येईल. त्यासाठी ८९८३८३९४६८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर व ०२५७-२२३९०५४ कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा लागणार आहे.
तक्रार निवारण कक्षात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे (८९८३८३९४६८), वरिष्ठ लिपीक संतोष भावसार (८९८३८३९४६८), कृषी सहाय्यक समाधान देवरे(८९८३८३९४६८) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.