Maharashtra Crime: दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या वादातून काही जणांनी एका युवकावर गोळीबार करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (२४ एप्रिल) रात्री १० वाजता घडली. जळगाव शहरातील मीनाताई ठाकरे संकुल परिसरात हा प्रकार घडला आहे. महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे (वय २५, रा. प्रबुद्ध नगर) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महेंद्र सपकाळे हा गुरुवारी रात्री मित्र सचिन चौधरी याचा वाढदिवस असल्यामुळे मीनाताई ठाकरे संकुल परिसरात आला होता. वाढदिवस साजरा करत असतानाच त्या ठिकाणी अचानक चार ते पाच जण आले. त्यानंतर संबंधितांनी महेंद्र याच्यासह त्याचा मित्र सचिन चौधरी याला मारहाण केली.
गावठी कट्टा काढला अन् गोळीबार केला
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महेंद्र व त्याचे मित्र घाबरले. हा वाद सुरू असतानाच एकाने गावठी कट्टयातून गोळीबार केला. त्यापैकी एक गोळी महेंद्र याच्या कमरेखाली लागली. त्यात तो गंभीर जखमी झाला.
या घटनेनंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. महेंद्रवर गोळीबार झाल्याची माहिती त्याचा दुसरा मित्र मनोज भालेराव याला मिळाली.
घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रिकाम्या काडतुसाची पुंगळी जप्त केली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
... म्हणून वाचला महेंद्रचा जीव
वादानंतर हल्लेखोरांनी महेंद्रच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारातून वाचवण्यासाठी महेंद्र सैरावैरा धावत सुटला. त्यात त्याच्या मांडीवर गोळी लागली. त्यानंतर तो परिसरातील एका घरात घुसला आणि मधून दरवाजा बंद करून घेतला.
त्यामुळे हल्लेखोरांना त्याला गाठता आले नाही आणि ते घटनास्थळावरून पसार झाले. महेंद्रने घरात आश्रय घेतल्यामुळे त्याच्या जीव वाचल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, रामानंद नगर आणि जिल्हापेठ पोलिसांनी जखमीची विचारपूस करत चौकशी केली. जखमी महेंद्र सपकाळे याने हा हल्ला केला.