दमदार पावसाने जळगाव जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST2021-08-19T04:21:56+5:302021-08-19T04:21:56+5:30
एकाच रात्रीत शहरात ५३ मिमी पाऊस : रस्ते दुरुस्तीच्या कामांचे पितळ उघड; खड्डेमय रस्त्यांवर साचले पाणी लोकमत न्यूज नेटवर्क ...

दमदार पावसाने जळगाव जलमय
एकाच रात्रीत शहरात ५३ मिमी पाऊस : रस्ते दुरुस्तीच्या कामांचे पितळ उघड; खड्डेमय रस्त्यांवर साचले पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात मोठ्या खंडानंतर मंगळवारी रात्रीपासून पावसाने दमदार पुनरागमन केले असून, एकाच रात्रीत जळगाव शहरात तब्बल ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जळगाव शहरात रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने संपूर्ण शहर जलमय झाले असून, मंगळवारी सायंकाळी ७ वाजेपासून सुरू झालेल्या पावसाची रिपरिप बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंतदेखील सुरूच होती. शहरात मंगळवारी रात्री व बुधवारी सकाळी झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून, वाहनधारकांना वाहने चालविताना जीवघेणी कसरत करावी लागली.
जून महिन्यापासून पावसाळ्यास सुरुवात झाली असली जळगावात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मागील महिन्यात दोन ते तीन वेळा तुरळक पावसाने हजेरी लावून जळगावकरांना दिलासा दिला होता. मात्र, त्यानंतर जोरदार पाऊस झालेला नव्हता. जुलै महिन्यात काही दिवस पावसाची रिपरिप सुरू होती. पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने उकाड्यात वाढ झाली होती. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांतदेखील पावसाने दडी मारली होती. मात्र, मंगळवारी रात्री आलेल्या जोरदार पावसाच्या आगमनाने जळगावकर सुखावले आहेत. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अवघ्या तासाभरात संपूर्ण जळगाव शहर जलमय केले. शहरातील नवीपेठ परिसरातील रस्ते तसेच नटवर मल्टिप्लेक्ससमोरील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. रस्त्यावर साचलेल्या या पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांची तारांबळ उडत होती. या वेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नाल्यांना पूर; गटारी ओसांडल्या
रात्री झालेल्या या पावसामुळे जळगावातील लेंडी नाला व दवंड्या नाल्याला पूर येऊन पाणी अक्षरश: रस्त्यावर आले होते. शहरातील सर्वच भागातील गटारी ओसांडून त्यांचे पाणीही रस्त्यावर येऊन सखल भागात व सखल भागातील रस्त्यांवर गुडघा गुडघा पाणी साचले होते. शहरातील नवीपेठ, कोर्ट चौकासमोरील रस्ता, गणेश कॉलनी चौक व नवीन बसस्थानक तसेच आकाशवाणी चौकात गटारींचे पाणी रस्त्यावर येऊन रस्ते पाण्याने भरले होते.