जळगावात हद्दपार आरोपीने मारहाण करून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 12:00 IST2017-08-24T11:56:55+5:302017-08-24T12:00:05+5:30
दोघांना अटक : गेंदालाल मिल भागातील घटना

जळगावात हद्दपार आरोपीने मारहाण करून लुटले
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24 - रस्त्याने घरी जात असलेल्या फिरोज खान हबीब खान (रा.गेंदालाल मील, जळगाव) या तरुणाला फताब खान व मजीद रशीद पठाण यांच्यासह अन्य दोन अशा चौघांनी मारहाण करुन खिशातील पाचशे रुपये काढून पळ काढल्याची घटना बुधवारी सायंकाळी गेंदालाल मील भागात घडली. दरम्यान, मारहाण करणा:या दोघांना दोन तासातच शहर पोलिसांनी शोधून काढले. यातील मजीद पठाण हा वर्षभरासाठी हद्दपार झालेला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, फिरोज खान हे बुधवारी सायंकाळी घरी जात होते. त्यावेळी रस्त्यातच फताब खान व मजीद पठाण या दोघांनी फिरोज यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर फिरोज यांच्या खिशातून जबरदस्तीने पाचशे रुपये काढून घेतले. ही घटना समजल्यानंतर फिरोज यांचे भाऊ इकबाल हे त्याठिकाणी आले. भावाचे पैसे का घेतले असा जाब विचारला असता दोघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी अफता व मजीद यांचे दोन साथीदारदेखील त्या ठिकाणी आले व चौघांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.
फिरोज व इकबाल या भावंडांनी शहर पोलीस स्टेशन गाठले. संशयितांच्या वर्णनावरुन शहर पोलीस स्टेशनचे प्रितम पाटील, विजयसिंग पाटील, नवजीत चौधरी, सुनील पाटील यांनी शोध घेतला असता फताब व मजीद हे दोघं गेंदालाल मिल भागात आढळले. याप्रकरणी फिरोज यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.