Jalgaon: महावीर अर्बन सोसायटीवर जिल्हा बँकेची जप्तीची कारवाई, संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करणार
By सुनील पाटील | Updated: October 30, 2023 19:38 IST2023-10-30T19:38:10+5:302023-10-30T19:38:25+5:30
Jalgaon News: तब्बल ३१ कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी जिल्हा बँकेने शहरातील महावीर अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटीवर सोमवारी जप्तीची कारवाई केली.

Jalgaon: महावीर अर्बन सोसायटीवर जिल्हा बँकेची जप्तीची कारवाई, संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव करणार
- सुनील पाटील
जळगाव - तब्बल ३१ कोटी रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी जिल्हा बँकेने शहरातील महावीर अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटीवर सोमवारी जप्तीची कारवाई केली. यासंदर्भात नोटीसा डकविण्यात आलेल्या असून संचालकांच्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी दिली.
जिल्हा बँकेने सन २००२ मध्ये महावीर अर्बन को ऑप क्रेडीट सोसा.लि. जळगांव यांना ८ कोटीचे कर्जवाटप केलेले होते. कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने वारंवार तगादा लावला. त्याशिवाय संचालक मंडळाने दीड वर्षाची एक कमी परतफेड योजना (ओटीएस) सुविधा देवून सुध्दा संस्थेने कर्जाची परतफेड केलेली नाही. २०१९ मध्ये सहकार न्यायालयाच्या आदेशाने महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० चे कलम ९८ (ब) अन्वये वसुली
प्रमाणपत्र मिळवून वसुलीसाठी बँकेने प्रयत्न करीत आहे. त्यानुसार सोमवारी बँकेचे विशेष वसुली अधिकारी मयुर पाटील, सरव्यवस्थापक प्रल्हाद सपकाळे व मंगलसिंग सोनवणे आदींच्या पथकाने संचालकांच्या घरी धडक दिली.
यांच्या मालमत्ता होणार विक्री
बँकेच्या पथकाने सोसायटीचे संचालक सुरेंद्र लुंकड, सुभाष सांखला, तुळशिराम बारी, सुरेश टाटीया, अपना राका, सुरेश बन्सीलाल जैन, महेंद्र शहा, अजित कुचेरीया यांच्या घरी व सोसायटीच्या नवीपेठ येथील कार्यालयात जप्तीची कारवाई करुन नोटीसा डकविल्या. मुद्दल व व्याज मिळून सोसायटीकडे जिल्हा बँकेचे ३१ कोटी २८ लाख रुपये घेणे आहे. संचालक मंडळाला जबाबदार धरुन ही कारवाई करण्यात आली.