जळगाव : केंद्र सरकारच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या जयपूर येथील राष्ट्रीय सनियंत्रण संस्था भारती विकास संस्थेतर्फे मनोज दीक्षित हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली.
या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे (भूसंपादन), कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डिगंबर लोखंडे, तहसीलदार जितेंद्र कुवर, बोदवड, चोपडा, पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, कैलास सोनार आदी उपस्थित होते.
या गावांना देणार भेेटी
दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील समिती २० सप्टेंबरपर्यंत जळगाव जिल्ह्यातील विविध दहा गावांना भेटी देऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान, एनएसईपी, आजिविका, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, डिजिटल इंडिया, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, भूमी अभिलेख, संसद आदर्श ग्राम योजना आदी योजनांचा आढावा घेतील. तसेच लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ही समिती भडगाव तालुक्यातील कोळगाव, पिचर्डे, कोठली, पाचोरा तालुक्यातील लोहटार, जामनेर तालुक्यातील खातगाव, माळपिंप्री, बिलवाडी आणि बोदवड तालुक्यातील जलचक्र, साळशिंगी, शिरसाळे या दहा गावांना भेट देऊन पाहणी करणार आहे, अशी माहिती समितीचे समन्वय अधिकारी लोखंडे यांनी दिली.