ड्रग्जमाफिया ललीत पाटीलला पळवायला सरकारनेच मदत केली - नाना पटोले
By सुनील पाटील | Updated: October 28, 2023 15:27 IST2023-10-28T15:27:12+5:302023-10-28T15:27:27+5:30
महाराष्ट्राचा उडता पंजाब होऊ देणार नाही

ड्रग्जमाफिया ललीत पाटीलला पळवायला सरकारनेच मदत केली - नाना पटोले
जळगाव : ड्रग्जमाफिया ललीत पाटील याला पळविण्यासाठी सरकारनेच मदत केली आहे. दाल मे कुछ काला नही, तो पुरी दालही काली है. ससून रुग्णालयाचे डीनही यात दोषी आहेत. पण सरकार त्यांच्यावर कारवाई करु शकत नाही. कारवाई केली तर त्याला तेथे कोणी मदत करायला लावली, हे ते सांगतील व सरकारचे पितळ उघडे पडेल म्हणून डीनवर कारवाई केली जात नाही, असा आरोप कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी जळगावात पत्रकार परिषदेत केला.
नाना पटोले शनिवारी खानदेशच्या दौऱ्यावर आले. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जळगाव शहर व ग्रामीण कॉग्रेसची आढावा बैठक त्यांनी घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ड्रग्जमुळे महाराष्ट्रातील तरुण बरबाद होत चालली आहे. गुजरातमधूनच हे ड्रग्ज महाराष्ट्रात येत आहे. पण आम्ही महाराष्ट्राचा उडता पंजाब होऊ देणार नाही. भविष्यात ललीत पाटीलचे काहीही होऊ शकते अशी भीतीही पटोले यांनी व्यक्त केली.
नोटबंदी जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार
भारतातील नोटबंदी हा जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. जगानेही ते मान्य केले आहे. अनेक जण यात बरबाद झाले. ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मोदींनी ज्यांच्यावर केला, आता त्यांनाच व्यासपीठावर घेऊन बसले. आता कुठे गेला भ्रष्टाचार. २०१४ मध्ये मोदींनी घोषणा केली होती की शेतमालाला दोन पटीने भाव देऊ, आता तर भाव नसल्याने दहा पटीने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राज्यातील एक मंत्री सांगतो बेराजगारी नाही, दुसरा मंत्री म्हणतो नोकरी नसल्याने बेराजगार आत्महत्या करु लागले आहेत. तरुणांना नोकऱ्या देण्याऐवजी जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार सरकारकडून केले जात असल्याची टिका पटोले यांनी केली.