चार वाजेनंतरही दुकाने सुरू ठेवणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:41+5:302021-07-02T04:12:41+5:30
मनपाकडून पाच दुकाने सील : ७० हॉकर्सवर कारवाई अन् वादही लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध ...

चार वाजेनंतरही दुकाने सुरू ठेवणे पडले महागात
मनपाकडून पाच दुकाने सील : ७० हॉकर्सवर कारवाई अन् वादही
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दुपारी ४ वाजेनंतर सर्व प्रकारची व्यावसायिक दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही, गुरुवारी दुपारी ४ वाजेनंतर दुकाने उघडी आढळून आल्यामुळे मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून ५ दुकाने सील करण्यात आली असून, प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे.
मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजेनंतरदेखील अनेक व्यावसायिक आपले व्यवसाय बंद न करता, सुरूच ठेवत असल्याचे आढळून येतात. त्यामुळे गुरुवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाने दुपारी ४ वाजेनंतरदेखील पाहणी केली असता, नवीपेठ व मुख्य बाजारपेठ परिसरातील काही दुकाने उघडी असल्याचे आढळून आले. तसेच या दुकानांमध्ये ग्राहकांचीदेखील गर्दी होती. त्यामुळे मनपाकडून पाचही दुकाने सील करण्यात आली आहेत. दरम्यान, मनपाकडून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचीही माहिती मनपा उपायुक्तांनी दिली.
हॉकर्स है की मानते ही नहीं...
मनपा प्रशासनाने शहरातील हॉकर्सला व्यवसाय करण्यासाठी ९ जागा निश्चित करून दिल्या आहेत. मात्र, शहरातील हॉकर्स या ९ जागांवर व्यवसाय न करता मुख्य बाजारपेठ व इतर रस्त्यांलगत व्यवसाय करण्यावर ठाम आहेत. त्याचप्रमाणे अनेक हॉकर्स मुख्य बाजारपेठेतील बळीरामपेठ, सुभाष चौक याच भागात व्यवसाय करत आहेत. गुरुवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून जोरदार कारवाई करून, ७० हॉकर्सचा माल जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान मनपा कर्मचारी व हॉकर्सदरम्यानदेखील वाद झाले.