आठवडाभर मुक्कामानंतर पावसाची उसंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:41 IST2019-10-30T12:40:07+5:302019-10-30T12:41:09+5:30
शहरवासीयांसमोर आता साथीच्या आजारांचे आव्हान उभे आहे़

आठवडाभर मुक्कामानंतर पावसाची उसंत
जळगाव : गेल्या आठवडाभरानंतर मुक्कामी असलेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर उसंत घेतली होती़ सूर्याचे दर्शन झाल्यामुळे शहरवासीयांनाही मोठा दिलासा मिळाला़ सोमवारीही ऊन पडले होते मात्र, रात्री पुन्हा पावसाने हजेरी लावली होती़ शहरवासीयांसमोर आता साथीच्या आजारांचे आव्हान उभे आहे़
गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण व रिमझीम पावसाने जिल्हावासीय बेहाल झालेले आहेत़ पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून लक्ष्मीपुजनाचा पूर्ण दिवस व बाजारपेठ पाण्यात गेल्याने शहरातही मोठे नुकसान झाले़
अनेकांच्या रोजगारावर या पावसाचा विपरीत परिणाम झाला़ सोमवारी या पावसाने काहीशी उसंत घेतली होती मात्र, उन व ढगाळ वातावरण असा खेळ सुरू होते़ रात्री अखेर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला़
मंगळवारी मात्र दुपारी अकरापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत ऊन पडलेले होते़ ढगाळ वातावरण नव्हते़
जिल्हाभरात १४० टक्के पार
यंदा पावसाने दिवाळीतही मुक्कमा ठोकत जिल्हाभरात १४० टक्के पाऊस झालेला आहे़ अनेक वर्षानंतर शंभरी पार केलेला पावसाने आता १५० टक्क्यांकडे वाटचाल सुरू ठेवल्याचे चित्र आहे़ जलसाठ्यांसाठी उपयोगी असलेला हा पाऊस मात्र, पिकांचा कर्दनकाळ ठरला आहे़