जळगाव : कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या जिल्ह्यातील बालकांना आणि विधवा महिलांना शासनाच्या मिशन वात्सल्य योजनेचा लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले. कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी गठित कृती दलाची बैठक गुरुवारी (दि. १६) जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली.
यावेळी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त य. कों. बेंडकुळे, महिला व आर्थिक विकास महामंडळाचे उल्हास पाटील, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष वैजयंती तळेले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, शासनाने मिशन वात्सल्य योजना जाहीर केली आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून लाभार्थींना आवश्यक ते लाभ देण्याची कार्यवाही सर्व विभागांनी तातडीने करावी.
सामाजिक संस्थांनी किती केली मदत
- भरारी फाउंडेशनने १३ अनाथ मुलांना प्रत्येकी पाच हजार रुपये, शैक्षणिक किट व एका महिलेला किराणा साहित्य दिले.
- गार्डियन फाउंडेशनने एका मुलाला १२ हजार ५०० रुपये, एका मुलीला ११ हजार रुपये शैक्षणिक फी दिली.
- लोकसमन्वय प्रतिष्ठानने दोन मुलांना फी माफीसाठी मदत केली.
- मौलाना आजाद फाउंडेशनने तीन विधवा महिलांना शिलाई मशीन दिले.
- साने गुरुजी फाउंडेशनने एक अनाथ बालकास शैक्षणिक किट व एका विधवा महिलेस आर्थिक सहकार्य केले.
कुणाला किती लाभ?
- बालसंगोपन योजनेचे आदेश दिलेल्या बालकांची संख्या ३०२
- २८५ विधवा महिलांना मिळणार संजय गांधी निराधार योजनेचा लाभ
- दोन्ही पालक गमावलेल्या २० बालकांना पाच लाख मुदत ठेवीसाठी बँक खाते सुरू
- पिवळे रेशन कार्ड देण्याचा प्रस्ताव