(डमी ११८१)
अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये खरीप हंगामात उडीद, मुगाच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र वाढू लागले आहे. सोयाबीनच्या बियाणांतदेखील आता लवकर येणारे, मध्यम कालावधीत येणारे व उशिराने येणारे बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पाऊस कधीही झाला तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदाच होणार असून, जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यावरदेखील सोयाबीनचे पीक तग धरून आहे.
सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळत असल्यानेदेखील इतर पिकांच्या तुलनेत शेतकरी सोयाबीनच्या लागवडीलाच प्राधान्य देत आहेत. पाऊस कमी झाला की जास्त झाला तरीही उडीद व मुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. मात्र, सोयाबीनला जास्त फरक पडत पडत नसल्याने जिल्ह्यात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात खरीप क्षेत्रात ३० ते ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होत आहे.
जिल्ह्यात वाढला सोयाबीनचा पेरा
२०१७ - २१ हजार हेक्टर
२०१८ - २३ हजार हेक्टर
२०१९ - २४ हजार हेक्टर
२०२० - २७ हजार हेक्टर
२०२१ - २९ हजार हेक्टर
झटपट येणारे सोयाबीन
जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर जूनच्या अखेरच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यात सोयाबीनची लागवड होत असते. झटपट येणारे सोयाबीनच्या बियाणाची लागवड केल्यानंतर सुमारे तीन महिन्यात हे पीक काढण्याचा स्थितीत येते. त्यामुळे सुरुवातील व मधे केव्हाही पाऊस झाला तरी या पिकाला फायदाच होतो.
मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन
मध्यम कालावधीत येणाऱ्या सोयाबीनची लागवड हीदेखील जूनच्या शेवटच्या आठवड्यात होते. लागवड झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पीक काढणीयोग्य होत असते. सद्यस्थितीत या पिकाची स्थिती चांगली असून, यंदा हंगाम चांगला राहण्याची शक्यता आहे.
जास्त कालावधीत येणारे सोयाबीन
या सोयाबीनचा कालावधी हा पूर्ण चार महिन्यांचा असतो. जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागवड झालेल्या सोयाबीनची काढणी ही ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होते. जास्त कालावधीसाठी लागवड झालेल्या सोयाबीनच्या पिकाला परतीचा पावसामुळे काही प्रमाणात नुकसान होण्याची भीती असते.
काय म्हणतात शेतकरी..
सोयाबीन हे पीक जास्त पावसातही तग धरून असते. तसेच गेल्या काही वर्षात सोयाबीनला चांगला भावदेखील मिळत आहे. त्यामुळे उडीद, मूग या पिकांपेक्षा सोयाबीन हे पीक आर्थिकदृष्ट्या फायदा देणारे असल्याने या पिकाच्या लागवडीला प्राधान्य आहे.
- जितेंद्र वसंत चौधरी, शेतकरी
उडीद व मुगाचे पावसामुळे नुकसान झाल्यामुळे पूर्ण हंगाम वाया जातो. त्या तुलनेत सोयाबीनचे नुकसान झाले तरी खराब मालाला दोन ते अडीच हजारपर्यंतचा भाव हा बाजारात मिळूनच जातो. त्यात पीक चांगले आले तर बाजारात सोयाबीनला चांगलाच भाव आहे.
- रमेश रामसिंग पाटील, शेतकरी
कोट
यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीनला फायदा आहे. मात्र, ज्या शेतात पाण्याचा निचरा झालेला नाही अशा ठिकाणी सोयाबीनचे नुकसान झाले आहे. मात्र, सरासरी स्थिती पाहिल्यास सोयाबीनच्या पिकाची गुणवत्ता चांगलीच आहे.
-संभाजी ठाकूर, कृषी अधीक्षक