कालिंका पतसंस्थेतील व्यवहाराची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST2021-08-20T04:21:01+5:302021-08-20T04:21:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यावल : आर्थिक डबघाईस गेलेल्या येथील श्री कालिंका नागरी पतसंस्थेचे अवसायक डी. एफ. तडवी ...

कालिंका पतसंस्थेतील व्यवहाराची चौकशी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
यावल : आर्थिक डबघाईस गेलेल्या येथील श्री कालिंका नागरी पतसंस्थेचे अवसायक डी. एफ. तडवी यांनी चौकशीस प्रारंभ केला आहे. यातून आर्थिक जबाबदारी निश्चित होणार असल्याने ठेवीदारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, येथील श्री कालिंका नागरी सहकारी पतसंस्थेची १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च १७ अखेरचा प्रशासकीय नोंदीनुसार कर्जदाराचे व्यवहार उशिराने नोंदविणे तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा व संचालक मंडळ सभा इतिवृत्ताबाबत संस्थेच्या नियमितपणे सभा झाल्या किंवा नाही तसेच संस्थेने कलम १०१ कामी वकील फी पोटी बरीच रक्कम खर्च केली आहे. त्याबाबत ताळेबंदमध्ये देणे दर्शवले नाही व संस्थेने थकीत कर्जदार यांच्या जंगम मालमत्तेचा लिलाव केला आहे. कर्जदाराच्या घरातील जप्त केलेल्या वस्तू कर्जदारास परत केल्या किंवा काय, याची खात्री करता येत नाही. तसेच संस्थेने बेकायदेशीररित्या रोखीने रकमा परत केल्या आहेत वगैरे याबाबत सहकारी संस्थांचे यावलचे उपलेखा परीक्षक डी. व्ही. ठाकूर यांनी १ मार्च २०१७ या कालावधीचा प्रशासकीय अहवाल सादर केला आहे. या प्रशासकीय अहवालाच्या अनुषंगाने कलम ८८ नुसार प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे.
संस्थेचे विद्यमान चेअरमन पंकज सोनार यांच्याकडून सहाय्यक निबंधकाकडून १९ मार्च २०२१ रोजी चौकशी केल्यानुसार सोनार यांच्याकडून पदभार काढून घेत महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १,९६१ त्यामधील नियम ७२ (१ ) नुसार दिनांक ७ जानेवारी २०२० पासून संस्थेचे अवसायक म्हणून डी. एफ. तडवी यांची नियुक्ती झाली आहे. संस्थेस लाखो रुपयांचे झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी तत्कालीन संस्थेचे चेअरमन व संचालक यांच्यावर का निश्चित करू नये, यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ मधील तरतुदीनुसार चौकशी करून संस्थेस झालेल्या लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानाची जबाबदारी निश्चिती करणे आदी आर्थिक बाबीची चौकशी अवसायक तडवी करणार आहेत.
पतसंस्थेमधील गैरव्यहाराचा सातत्याने संचालक मंडळाने पाठपुरावा केल्याने अखेर या अपहाराची चौकशी होऊन संचालक ठेवीदारांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा संचालक नितीन सोनार, संचालक देवराम कृष्णा राणे, टालू महाजन, सय्यद अखलाकअली यांनी व्यक्त केली आहे.