निरीक्षकाच्या मद्यपानाची चौकशी सुरु, अहवाल तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:12 PM2020-06-29T12:12:15+5:302020-06-29T12:13:29+5:30

उत्पादन शुल्क निरीक्षकाचे व्हीडीओ व्हायरल प्रकरण : ‘त्या’ दोघांची आज चौकशी

Inquiry into inspector's alcoholism begins, report prepared | निरीक्षकाच्या मद्यपानाची चौकशी सुरु, अहवाल तयार

निरीक्षकाच्या मद्यपानाची चौकशी सुरु, अहवाल तयार

Next

जळगाव : मद्यसाठ्याच्या तपासणी दरम्यान मद्याप्राशन करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. त्याचा अहवालही तयार झाला आहे. हा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्तांकडे पाठविला जाणार असून तेथून ते विभागाच्या आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर कारवाई झाल्यास ती मुंबई येथूनच होऊ शकते, अशी माहिती मिळाली.
आवाजावरून पटली ओळख
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा जळगावातीलच असल्याची खात्री जवळपास पटली असून तो कदाचित जुना व्हिडिओ असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मात्र तरीदेखील हा गंभीर प्रकार असल्याने त्यात आवाज असलेल्या दोघांची ओळख पटली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांना २९ जून रोजी नाशिक येथे बोलविण्यात आले आहे.
कार्यालय रामभरोसे
उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षकपद गेल्या सहा महिन्यांपासून प्रभारी अधिकाºयाकडे असल्याने जिल्ह्यात या विभागात सर्व काही आलबेल असल्याचे चित्र विविध घटनांवरून दिसून येत आहे. लॉकडाऊनदरम्यान मद्य वाहतुकीकडे दुर्लक्ष असो की दुकानांची तपासणी कशा पद्धतीने होते यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असणाºया अधिकाºयाचा पदभारही जवळच्या जिल्ह्याकडे न देता थेट मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या अधीक्षकांकडे देण्यात आला आहे, हे विशेष.
लॉकडाऊनदरम्यान सर्व परमिट रुम, वाईन शॉप बंद ठेवण्याचे आदेश असताना मद्याची सर्रास वाहतूक सुरू राहिली. नशिराबाद येथील गोदामातून मद्यसाठी दुकानांना पुरविण्यात आला. यातून हे बिंग फुटले.


दुय्यम निरीक्षक असताना गोदाम खाली
नशिराबाद येथे ज्या गोदामात मद्याचा साठा पुरविण्यात आला त्या गोदामाच्या ठिकाणी दुय्यम निरीक्षक यांची ड्युटी होती. तरीदेखील तेथून मद्याची वाहतूक झाली. गोदामासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून नरेंद्र दहीवडे यांची नियुक्ती होती. तरीदेखील सील काढून मद्याची वाहतूक झालीच कशी असा प्रश्न निर्माण होत आहे. संबंधितांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारीच नसल्याने हे प्रकार घडत असल्याचा आरोप होत आहे. या सोबतच उत्पादन शुल्क विभागातर्फे मद्य दुकानांच्या तपासणीदरम्यान अधिकारीच मद्यप्राशन करीत नोंदी करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. निरीक्षक नरेंद्र दहीवडे हे एका मद्य दुकानात तपासणी करतानाच मद्यप्राशन करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या विभागाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अधिकारी मद्यप्राशन करीत असलेला व्हिडिओ खरा असल्याची खात्री पटली असून त्या बाबत अहवाल विभागाच्या आयुक्तांकडे पाठविण्यात येईल. या व्हिडिओमधील दोघांच्या आवाजाची ओळख पटली असून त्यांना चौकशीसाठी बोलविले आहे. धुळ््यातही अधीक्षकपद रिक्त असल्याने जळगावच्या अधीक्षकपदाचा कारभार तेथे देता आलेला नाही.
- ए.एन. ओहोळ, उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग.

नऊ महिन्यांपासून सर्व प्रकरणे प्रलंबित
सप्टेंबर २०१९मध्ये तत्कालीन अधीक्षक निवृत्त झाल्यानंतर परमिट रुम, वाईन शॉप, बियर शॉप यांच्या मंजुरी साठीच्या फाईल या विभागाकडे पडून आहेत. नऊ महिन्यात एकही प्रकरण मंजूर झालेले नसल्याने यातून महसूलही बुडत आहे.

Web Title: Inquiry into inspector's alcoholism begins, report prepared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.