महिंदळे परिसरात कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:21 IST2021-09-10T04:21:33+5:302021-09-10T04:21:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क महिंदळे, ता. भडगाव : महिंदळे परिसरात पावसाची सुरुवातच वरुणराजाच्या वक्रदृष्टीने झाली. कुठे ढगफुटी तर काही ...

महिंदळे परिसरात कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण
लोकमत न्यूज नेटवर्क
महिंदळे, ता. भडगाव : महिंदळे परिसरात पावसाची सुरुवातच वरुणराजाच्या वक्रदृष्टीने झाली. कुठे ढगफुटी तर काही ठिकाणी महापुराने होत्याचे नव्हते केले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. परंतु महिंदळे परिसरात म्हणावा तसा दमदार पाऊस अजूनही आला नाही.
अजूनही परिसराला रिमझिम पावसावरच समाधान मानावे लागत आहे. आजही नाले मनसोक्त वाहून निघाले नाहीत. केटीवेअर, पाझर तलाव, विहिरी कोरडेच आहेत. या रिमझिम पावसाने पीकस्थिती उत्तम होती; परंतु अचानक कपाशी पिकावर लाल्या रोगाने डोके वर काढल्याने कपाशी लाल पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
खर्चाच्या तुलनेत उत्पन्न निम्मेही येणार नाही.
निसर्गाने यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडाला चांगलीच पाने पुसली आहेत. दमदार पाऊस तर अजूनही परिसराला पाहावयास मिळाला नाही. कधी तुरळक तर कधी दीर्घ विश्रांती यात पिकांची वाढ तर खुंटली तरीही विहिरींच्या पाण्यावर पिके जोमात होती.
लागवडीपासूनच परिसरात तुरळक पाऊस असल्यामुळे पिके जोमात होती. विहिरींच्या पाण्यावर जगवलेली पिके आता तयार होण्याच्या मार्गांवर होती; परंतु रिमझिम पावसामुळे कपाशीवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाला; परंतु शेतकऱ्यांनी महागडी कीटकनाशक फवारून व रासायनिक खते देऊन पिके चांगली ठेवली. पिके जोमात असल्यामुळे शेतकऱ्यांनी अव्वाच्या सव्वा खर्च पिकांसाठी केला. आता मात्र माल पक्व होत होता. दहा-बारा बोंडे पक्व झाली आहेत. तेवढ्यात लाल्या रोगाचे आक्रमण झाले.
झाडावरील पाने गळायला सुरुवात झाली आहे त्यामुळे जी पक्व बोंडे आहेत, ती फुटतील तर काही या रिमझिम पावसामुळे काळी पडून सडतील. यामुळे झालेल्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न निम्मेही येणार नाही.
भाजीपाल्याने कंबरडे मोडले आता
शेतकऱ्यांचे खेळते भांडवल म्हणजे भाजीपाला लागवड. परंतु शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्वच भाजीपाला यावर्षी मातीमोल भावात विकला गेला. भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकावा लागला. उभ्या पिकावर नांगर फिरवावा लागला. भाजीपाला पिकाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असताना निसर्गाच्या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे पांढरे सोने आता लाल्या रोगाच्या विळख्यात सापडले आहे. पावसाने उघडीप देताच लाल्याने आपले डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
090921\09jal_1_09092021_12.jpg
लाल्या रोगाच्या विळख्यात सापडलेले महिंदळे परिसरातील कपाशी.