कंडारे, झंवर फरारच : दोन गुन्ह्यांचा तपास सुरुच
जळगाव : पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल बीएचआरच्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या आठवडाभरात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार सुनील झंवर व अवसायक जितेंद्र कंडारे यांना अद्यापही अटक झालेली नाही. त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून न्यायालयाने त्यांना ४ मार्चपर्यंत शरण येण्याचे आदेश दिले आहेत.
बीएचआरच्या अवसायकासह इतरांनी ठेवीदारांची फसवणूक व अपहार केल्याचे तीन गुन्हे नोव्हेंबर २०२० मध्ये पुण्यात दाखल झाले आहेत. यातील डेक्कन पोलीस ठाण्यात रंजना घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दाखल गुन्ह्यात आतापर्यंत विवेक ठाकरे, महावीर जैन, सुनील झंवरचा मुलगा सूरज, सुजित वाणी, धरम साखला याच्यासह सात संशयितांना पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. यातील सहा संशयित सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. २७ नोव्हेंबर रोजी १३५ जणांच्या पथकाने जळगावात छापेमारी करुन महत्त्वाचे कागदपत्र, पुरावे, संगणक जप्त केले होते. दरम्यान, या पहिल्या गुन्ह्यात मंगळवार, २३ रोजी दोषारोपपत्र दाखल होणार असल्याचे आर्थिक गुन्हा शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेने दोषारोपपत्र तयार केले असून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत. गेल्या आठवड्यातच पुण्याच्या पथकाने सुनील झंवर व कंडारे यांच्याबाबतच्या नोटिसा न्यायालय, त्यांचे घर व पोलीस ठाण्यात डकविल्या होत्या.
--