कर्जबाजारी तरूण शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या
By सागर विजयकुमार दुबे | Updated: April 27, 2023 00:03 IST2023-04-27T00:02:44+5:302023-04-27T00:03:25+5:30
देव्हारी येथे अमोल वाघ हा तरूण शेतकरी आजोबा सोनाजी, आई कल्पनाबाई यांच्यासह वास्तव्यास होता. वाघ कुटूंबियांची उपजिवीका शेतीवर होती.

कर्जबाजारी तरूण शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव तालुक्यातील देव्हारी गावातील कर्जबाजारी तरूण शेतक-याने राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अमोल अरूण वाघ (२४) असे मृत शेतक-याचे नाव असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देव्हारी येथे अमोल वाघ हा तरूण शेतकरी आजोबा सोनाजी, आई कल्पनाबाई यांच्यासह वास्तव्यास होता. वाघ कुटूंबियांची उपजिवीका शेतीवर होती. शेतीसाठी त्यांनी सोसायटीचे कर्ज घेतले होते. मात्र, शेतीत उत्पन्न नसल्यामुळे कर्ज फेडायचे कसे या तणावात अमोल असे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी आजोबा आणि आई घराबाहेर बसलेले असताना, अमोल याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. आजोबा, आई घरात आल्यानंतर त्यांना अमोल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने अमोल याचा मृतदेह खाली उतरवून तत्काळ जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला. याठिकाणी वैदयकीय अधिका-यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
पाच वर्षापूर्वी वडीलांची सुध्दा आत्महत्या
अमोल हा एकूलता एक मुलगा. त्याला एक बहिण असून ती विवाहित आहे. पाच वर्षांपूर्वी वडील अरूण वाघ यांनी देखील स्वत:ला पेटवून घेवून आत्महत्या केली होती. त्यामुळे कल्पनाबाई यांना मुलचा आधार होता. पण, आता एकुलत्या एक मुलचा आधार सुध्दा गेल्याने त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.