विसंवादी सूर विकास कामांना मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 12:47 PM2020-03-22T12:47:39+5:302020-03-22T12:49:07+5:30

प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमधील वादाच्या दुष्परिणामाचा इतिहास, निवडणुका लांब असताना विकासासाठी एक सूर का नाही?, वचनापासून लांब पळणाºया नेत्यांनी गमावला जनतेचा विश्वास

Inconsistent tone development work | विसंवादी सूर विकास कामांना मारक

विसंवादी सूर विकास कामांना मारक

Next

मिलिंद कुलकर्णी
प्रगती आणि विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या रथाच्या दोन चाकांमध्ये संवाद, समन्वय राहिला तरच गाडा सुरळीत चालतो. विसंवाद, संशय अशा बाबी आल्या तर मात्र ही स्थिती विकास कार्याला मारक ठरते. एकमेकांची उणीदुणी काढणे, आरोप प्रत्यारोप करणे यात शक्ती खर्च होते. हे कळत असूनही वळत नसल्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.
जळगावात सत्ताबदल करताना नागरिकांनी तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दावर विश्वास ठेवला. ‘एक वर्षांत जळगावचा चेहरामोहरा बदलून दाखवेल, अन्यथा विधानसभा निवडणुकीत मते मागायला येणार नाही’ असा निर्धार, निश्चय त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या वक्तव्यातील धडाडी, संकटमोचक अशी प्रतिमा पाहून जळगाव आणि पुढे धुळेकरांनी भाजपला बहुमत दिले. जळगावात तर आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे या महापौर झाला. एका कुटुंबात आमदार आणि महापौरपद आल्याने जळगावच्या विकासाचा रथ चौखूर उधळेल अशी अपेक्षा होती. पण दीड वर्षांत ती अपेक्षा फोल ठरली. त्यानंतर कैलास सोनवणे यांच्या पत्नी भारती सोनवणे या महापौर झाल्या. उपमहापौरपदाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. कैलास सोनवणे यांनी स्थायी समितीचे सभापती म्हणून अतुलनीय कार्य वर्षभरात केले होते. त्यांच्या स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेमार्फत राष्टÑीय आणि स्थानिक विषयांविषयी अभियान, चळवळी आयोजित करतात. स्वाभाविकपणे सोनवणे दाम्पत्याकडून जळगावकरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. अर्थात त्यांच्यापुढे प्रश्नांची मालिकादेखील मोठी आहे. अमृत पाणी योजना, भुयारी गटार योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, महामार्ग चौपदरीकरण, वॉटरग्रेस कंपनीकडील स्वच्छतेचे कंत्राट, शिवाजीनगर, असोदा व भोईटे नगर उड्डाणपूल असे अनेक विषय नागरिकांच्या जिव्हाळ्याचे आहेत. त्यापैकी केवळ स्वच्छतेच्या प्रश्नावरुन वादळ निर्माण झाले. प्रशासकीय अधिकाºयाविषयी तक्रार असेल तर महासभेत पुराव्यानिशी भंडाफोड करता येईल. आयुक्त किंवा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे तक्रार करता येईल. परंतु, अश्लिल शिवीगाळ, मारहाणीची धमकी देणे हे चुकीचे आहे. यातून प्रशासनाचे मनोबल खच्ची होईल. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेचे नेतृत्व स्विकारले असताना या प्रश्नी ते उघडपणे समोर का येत नाही, हा प्रश्न आहे. परवा, भाजप नगरसेवकांची गुप्त बैठक घेऊन वॉटरग्रेसचा ठेका रद्द करा, अशी सूचना त्यांनी दिली, असे सांगितले जाते. पण खरेच असे आहे की, पक्षांतर्गत सुंदोपसुुंदी शांत करण्यासाठी ही बैठक झाली, हे कळायला मार्ग नाही.
गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, खासदार उन्मेष पाटील, महापौर भारती सोनवणे यांनी समन्वयाने काम केले तर शहराचा चेहरामोहरा बदलेल.
एक वर्षांत जळगावचा विकास करुन दाखवेन या गिरीश महाजन यांच्या घोषणेचे काय झाले? महापालिकेत सावळागोंधळ सुरु असताना ते गप्प का? गुप्त बैठका घेऊन नगरसेवकांना ते काय संदेश देत आहेत, हे स्पष्ट व्हायला हवे.
अधिकाºयाला शिवीगाळ, धमकी देण्याचे
समर्थन होऊच शकत नाही. महापौरांचे पती कैलास सोनवणे यांच्याविरुध्द अशा आशयाचा गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेतील सत्ता ताब्यात असताना गैरव्यवहारात कोणीही अधिकारी सहभागी असेल तर पुराव्यासह ते जाहीर करा. महासभेत जाब विचारा. राज्य शासनाकडे तक्रार करायला हवी. असा विसंवाद हा विकास कामांसाठी मारक ठरतो.

Web Title: Inconsistent tone development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.