लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना काळात रुग्णांची सुश्रूषा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी सकाळी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने केली.
कोरोनाच्या दहतशतीत सर्व लोकप्रतिनिधी घरात असतांना शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉक्टर्स, नर्स वॉर्ड बॉय, कक्ष सेवक डाटा एन्ट्री ऑपरेटर, सुरक्षारक्षक, सफाई कामगार यांनी कोरोना संक्रमित रुग्णांची सेवा केली. त्यांना अचानक सेवेतून कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचा महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने निषेध केला आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे, अशी मागणीही केली. यावेळी सर्व कंत्राटी कर्मचारीदेखील उपस्थित होते.
कोरोना योद्ध्यांना शासकीय सेवेत सामावून न घेतल्यास मंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नसल्याचा इशाराही प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी दिला.
आंदोलनानंतर झाली बैठक
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन संपताच कोरोना योद्ध्यांची बैठक पार पडली. यावेळी संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी आरोग्य विभागात रिक्त असलेल्या जागांवर कोरोना योद्ध्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी केली.
यावेळी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक महानगराध्यक्ष नीलेश बोरा, रमेश सोनवणे, चंदन बिऱ्हाडे, दिलीप सपकाळे, फहीम पटेल, सुधाकर पाटील, संजय सपकाळे, चंद्रकांत नन्नवरे, वाल्मीक सपकाळे, कुंदन माळी, भाग्यश्री चौधरी, मंदाकिनी विंचुरकर, ऐश्वर्या सपकाळे, प्रतीक्षा सोनवणे, नंदा पाटील बापूसाहेब पाटील उपस्थित होते.