पातोंडा, ता. अमळनेर : संपूर्ण खान्देश प्रांताची कुलदैवत व भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखली जाणाऱ्या कानूबाई मातेचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
प्राचीन काळापासून सुरू असलेला कानुबाईचा उत्सव वर्षानुवर्षे परंपरेनुसार चालत आलेला आहे. यंदा नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी दि. १५ ऑगस्ट रोजी कानुबाईचे मोठ्या दिमाखात आगमन झाले. त्याच्या आदल्या दिवशी शनिवारी भाजी-भाकरी रोटांचे पूजन करून जवळच्या भाऊबंदकीतील लोक खात असतात. यावेळी शेतातील किल्लूच्या भाजीचे महत्त्व असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपासूनच कानबाईची मांडणूक (स्थापना)ची जोरदार तयारी होत असते.
कानबाई मातेची अलंकाराने सजवून चौरंगावर विधिवत स्थापना केली जाते. काही भाविक परंपरेनुसार विधिवत दोन नारळाची कान्हाबाईची, कानबाई-रानबाई, कानबाई-कण्हेर, हातापायाची कानबाई अशा पध्दतीने स्थापना किंवा मांडणी करतात. सायंकाळी कानबाई मातेची पुरणपोळी, सार-भात (रोट)चे नैवद्य समोर ठेवून पूजन आरती करतात. पूजेवेळी सर्व भाऊबंदकीचे लोक पूजेसाठी हजर असतात. हे नैवेद्य फक्त जवळील भाऊबंदकीतील लोक खात असतात. रोट जास्त असल्यास तीन-चार दिवस खात असतात.
यावेळी बाहेरगावी वास्तव्यास असलेली भाऊबंदकीही रोट खाण्याच्या निमित्ताने एकत्र येत असतात. या एकत्र येण्यामुळे भाऊबंदकीतील रुसवे-फुगवे निघून जातात व भेट होते. त्यानंतर रात्री कानबाईचे पाया पडण्यासाठी भाविक भक्त विशेष महिलावर्ग येत असतात. यावेळी फुगड्या व लाऊड स्पिकरवर नाचण्याचा आनंद घेतला. यावेळी रात्रभर जागरण झाले. दुसऱ्या दिवशी सोमवारी वाजत गाजत डीजेच्या तालावर ठेका धरत कानबाईला डोक्यावर धरत मोठ्या उत्साहात संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. माहिजी देवी प्रांगणात गावातील सर्व कानबाई मातांची कानबाईच्या जयघोषात विसर्जन करण्यात आले.
160821\16jal_7_16082021_12.jpg
पातोंडा येथे कानबाई मातेच्या मूर्तीचे विसर्जन