शिरसोली : तालुक्यातील शिरसोली येथे ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषात मोठ्या भक्तिभावाने सात दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
शिरसोली प्र.बो. व प्र. नं. या दोन्ही गावांत सात दिवसांच्या गणपतींची स्थापना केली जात असते. त्यानुसार यंदाही कोरोनाचे संकट पाहता गावातील युवा बजरंग मंडळ, दोस्ताना गणेश मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, शिवनेरी गणेश मंडळ, अस्वार वाडा मित्र मंडळ, पवार वाडा मित्र मंडळ, घारे वाडा मित्र मंडळ, नागवेल मित्र मंडळ यासह एकूण एकवीस लहानमोठ्या मंडळांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून गणरायाची स्थापना केली. दरम्यान, गुरुवारी सातव्या दिवशी सायंकाळी मंडळांकडून गणरायाचे विसर्जन करण्यात आले. परिस्थिती पूर्वपदावर येऊ दे अशी मनोभावे प्रार्थना गणेश भक्तांकडून करण्यात आली. गणेश विसर्जनाला कुठलेही गालबोट लागू नये म्हणून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, जितेंद्र राठोड, सिद्धोधन ढवळे, तुकाराम निंबाळकर, किशोर पाटील, पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी, शरद पाटील, समाधान टहाकळे यांचा चोख बंदोबस्त होता.